
माजी चेअरमन कोठीवाले यांची माघार; नवीन १२ संचालकांचा समावेश
निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभाचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची आठवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनिल मोरब यांनी दिली. यावेळी माजी चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांनी माघार घेतली आहे. तर नवीन १२ संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.
अर्ज माघार घेणाऱ्यांमध्ये ‘अ’ गटातून कारखान्याचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, ज्येष्ठ संचालक पप्पूअण्णा पाटील, किरण निकाडे, राजाराम खोत व रुद्रकुमार कोठीवाले यांचा समावेश आहे. तर अरुण जावीर व प्रताप मेत्राणी (एससी), मनीषा रांगोळे (अ गट महिला) बाळासाहेब कदम (ओबीसी) यांच्यासह म्हाळाप्पा पिसुत्रे, मिथुन पाटील व अमित रणदिवे यांनी माघार घेतली.
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे
अ गटः आप्पासाहेब जोल्ले (एकसंबा), अविनाश पाटील (नांगनूर), जयकुमार खोत ( शमणेवाडी), जयवंत भाटले (निपाणी), एम. पी. पाटील (जत्राट), पवनकुमार पाटील (मांगुर), प्रकाश शिंदे (भिवशी), रामगोंडा पाटील (जनवाड), रमेश पाटील-खेम्माण्णा (बेनाडी), रावसाहेब फराळे (अकोळ), समित सासणे (पडलीहाळ), शरद जंगटे (बोरगाव), सुकुमार पाटील ( बुदीहाळ), विनायक पाटील (रामपूर), विश्वनाथ कमते (खडकलाट). एससी गट : सुहास गुगे (अकोळ), महिला गट : गीता सुनील पाटील (निपाणी), वैशाली किरण निकाडे (कुरली) ओबीसी गट : श्रीकांत बन्ने (गळतगा). बिगर ऊस उत्पादक ब गट : राजू गुंदेशा (निपाणी).
अर्ज माघारीपूर्वी झालेल्या बैठकीत खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, कारखाना प्रगतीपथावर आहे. ऊस उत्पादकांना वेळेवर बिले देणे, कामगारांचे प्रश्न सोडवून पगारवाढ देणे शक्य झाले आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सबल झाला नसला तरी येत्या दहा वर्षात कारखाना कर्जमुक्त होईल. चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, टप्प्याटप्प्याने कामगारांचे प्रश्न मार्गी लावले कामगार व सभासदांचा विमा उतरवला आहे. येणाऱ्या दहा वर्षात कारखाना राज्यात नंबर वन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी प्रणव मानवी, एम. पी. पाटील, पवन पाटील व बंडा घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
——————————————————————
निपाणीच्या नगरसेवकांना संधी
हालशुगरच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत निपाणीच्या एक अथवा दोन संचालकांना संधी मिळत होती. मात्र, यंदाची ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदर निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या विद्यमान चेअरमन चंद्रकांत कोठीवाले व त्यांचे सुपूत्र रुद्रकुमार कोठीवाले यांनी शुक्रवारी पहिलाच अर्ज माघार घेतले. अशा परिस्थितीत देखील गीता सुनील पाटील, जयवंत भाटले व राजू गुंदेशा यांच्या माध्यमातून निपाणीच्या तिघांना कारखान्याच्या संचालक पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. हे तीन संचालक निपाणीचे विद्यमान नगरसेवक आहेत. बोरगाव येथील नगरसेवक शरद जंगटे यांचीही संचालकपदी वर्णी लागली आहे. अक्कोळ येथील रावसाहेब फराळे व सुहास गुग्गे या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta