
गडहिंग्लजच्या ‘नेताजी पालकर’ने फोडली दहीहंडी : पावसाच्या रिपरिपमुळे नागरिक चिंब
निपाणी (वार्ता) : शनिवारी (ता.९) सायंकाळी निपाणी येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ‘गो, गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाचे कार्यकर्ते थरावर थर, रचण्याची त्यांची चुरस निपाणीकरांना अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाने फोडली त्यांना बोरगाव येथील पीकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते १ लाख १ रुपयांचे बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही दहीहंडी पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
सायंकाळी ६ वाजल्यापासूनच चाटेमार्केट परिसरातसतत होणाऱ्या ढोल वादाच्या गजरात कार्यकर्ते मनसोक्त नाचत होते. शिटीच्या तालावर शिस्तबद्ध रीतीने रचलेले मनोरे, एकाग्रता, शिस्त, सातत्य, अंगमेहनत अन् धाडस यांचा मिलाफ, चारही मुख्य बाजूंनी दिला जाणारा मानवी शिडीचा आधार, अलगद खांद्यावर चढणारे दोन किंवा तीन एक्के आणि गोविंदांची चिकाटी पाहण्याची पर्वणी नागरिकांना लाभली.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. येथील घट्टे गल्लीतील नवभारत गोविंदा पथकाला ११ हजार रुपये व मानचिन्ह, दर्गाह गल्लीतील संत बाबा महाराज चव्हाण गोविंदा पथकाला ६ हजार रुपये, संकेश्वरच्या भगतसिंग गोविंदा मंडळाला ५ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, नव्या पिढीने पारंपारिक साहसी खेळांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते योगदान देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पुढील वर्षी याच ठिकाणी एक लाख ११ हजार १ ११ रुपयाची दहीहंडी फोडण्याची घोषणा केली.
यावेळी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर -सरकार, श्रीमंत दादाराजे देसाई -सरकार संजय सांगावकर, शेरू बडेघर, शौकत मनेर, दत्ता नाईक, संजय पावले, विनायक वडे, सुनील शेलार, दिलीप पठाडे, अनिस मुल्ला, मंडळाचे अध्यक्ष सुजित देसाई -सरकार, उपाध्यक्ष अतुल शिंदे, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, अन्वर बागवान, विशाल घोडके, इम्रान मकानदार, शिरीष कमते, अनिल फुटाणकर, पांडुरंग भोई, अल्ताफ हाजूखान ओंकार शिंदे, अतुल शिंदे यांच्यासह चाटे मार्केट व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta