प्रशासनाचा भोंगळ कारभार ; शासकीय नोकरदारातून नाराजी
निपाणी (वार्ता) : शासनातर्फे वर्षभर विविध सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सुट्ट्या दिल्या जातात. आतापर्यंत सण उत्सवा दिवशीच सुट्टी जाहीर केली जात होती. मात्र यंदा सरकारने गणेशोत्सवाची सुट्टी सोमवारी (ता.१८) जाहीर केली आहे. तर विघ्नहर्ता गणेशाचे स्वागत मंगळवारी (ता.१९) होणार आहे. पण आदल्या दिवशी प्रशासनाने सुट्टी दिल्याने आगमना दिवशी शासकीय नोकरदारांना काम करावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षी गणेशाच्या आगमना दिवशीच शाळा, महाविद्यालये, बँका, महसूल खाते आणि इतर शासकीय कार्यालयांना सुट्टी दिली जात होती. त्यामुळे नोकरदार वर्गांना दिवसभर गणपती आणण्यासह विविध कामासाठी वेळ मिळत होता. याशिवाय विद्यार्थी वर्ग ही दिवसभर घरगुती गणेशासह सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती आणत होते. पण यंदा गणेशोत्सव मंगळवारी असताना प्रशासनाने सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे गणेशाच्या आगमना दिवशी नोकरदार वर्गांची मात्र मोठी तारांबळ उडणार आहे. त्यामुळे शासनाने त्याचा फेरविचार करून तात्काळ सोमवारची सुट्टी रद्द करून मंगळवारी गणेशाच्या आगमना दिवशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे.
——————————————————————-
आगमना दिवशी पडणार रजा
सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून ठराविक पगारी रजा दिल्या जातात. त्याचा वापर अनेक सरकारी नोकर महत्त्वाचे सणसमारंभ व कामासाठी वापर करतात. यंदा मात्र गणेशाच्या आगमनाला सुट्टी नसल्याने अनेक सरकारी नोकरदार या दिवशी रजा टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या दिवशी विद्यार्थ्याअभावी शाळाही रिकाम्या दिसणार आहेत.
——————————————————————-
‘दरवर्षी गणेशाच्या आगमना दिवशी सर्व शासकीय कार्यालयाला सुट्टी दिली जात होती. मात्र यंदा सर्व कार्यालयाबरोबरच शैक्षणिक खात्यामध्ये सुद्धा गणेशोत्सवाची सोमवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली असता सोमवारची सुट्टी रद्द करून मंगळवारची सुट्टी मिळाल्यास त्याबाबत पुन्हा नव्याने आदेश येण्याची शक्यता आहे.’
– महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta