राजू पोवार यांचा इशारा : रयत संघटनेची बैठक
निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात. यावेळी ऊसाला चांगला दर देण्याची घोषणा होते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किरकोळ दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांनी प्रति टन ३५०० रुपये आणि सरकारने २००० असे एकूण ५५०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी ९ ते १३ ऑक्टोबर अखेर अथणीपासून प्रत्येक तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रा काढणार आहेत. शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. धुपदाळ येथे शनिवारी (ता.१६) आयोजित संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा, यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांना निवेदन दिले आहेत. पण आज पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही प्रकारची निवेदन न देता थेट रस्त्यावर उतरून पदयात्रा काढली जाणार आहे.
त्यानंतर १३ रोजी बेळगाव विधानसभेवर मोर्चा काढून आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याला तात्काळ निधी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी पोवार यांनी केली.
अथणी येथील बसवेश्वर सर्कल पासून या पद यात्रेला सुरुवात होणार आहे. तेथून मुगळखोड, कल्लोळ, हुक्केरी, काकती मार्गे बेळगाव येथील सुवर्णसौधवर १३ रोजी ही पदयात्रा पोहोचणार आहे. तेथे ऊस दरासाठी आंदोलन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, साखरमंत्री, महसूलमंत्री आणि कृषिमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे.
बैठकीस चुन्नापा पुजारी, शिवानंद मुगलीहाळ, सुरेश परगन्नावर, इरान्ना ससालट्टी, मंजुनाथ पुजारी, तमन्ना पाटील, सुरेश गाडीवड्डर, गोपाल कोकणूर, पांडुरंग बिरानगड्डी, कलगोंडा कोटगे, सर्जेराव हेगडे, नितीन कानडे, एकनाथ सादळकर, सागर पाटील, बाळासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, चिनु कुळवमोडे, शिवाजी वाडेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta