
‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ : पर्यावरण जपण्याचा दिला संदेश
निपाणी (वार्ता) : विविध प्रकारच्या निवडी, दिवाळी, निवडणुका, वाढदिवस, यात्रा, जत्रा, गणेशोत्सवासह अनेक सण समारंभाच्या वेळी फटाक्यांची आतशबाजी केली जाते. त्यामुळे हवेचे प्रदूषण होण्यासह पर्यावरणाची हानी होत आहे. शिवाय कुटुंबप्रमुखांना आर्थिक भार सोसावा लागतो. ही बाब गांभीर्याने घेऊन जळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य स्नेहा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या गणेशोत्सवापासून फटाके उडवणार नसल्याची शपथ घेतली. त्यांच्या या पर्यावरण जनजागृतीच्या उपक्रमाचे शहर व परिसरात कौतुक होत आहे.
दरवर्षी गणेशोत्सव दिवाळी व आणि सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण वाढवून विविध प्रकारचे आजार जडत आहेत. या गोष्टीचा विचार करून मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात फटाके उडवणार नसल्याचे सांगितले. फटाक्यामुळे बऱ्याचदा अपघातही झाले आहेत. गेल्या दोन वर्षापासून फटाक्यांचे दरही वाढले असून त्याचा आर्थिक फटका सर्वांना बसत आहे. वरील सर्व गोष्टी टाळण्यासाठी मॉडर्न इंग्लिश स्कूलने राबवलेला उपक्रम पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असाच आहे.
——————————————————————
‘विविध कारणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे प्रदूषण होऊन त्याचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. त्याची दखल घेऊनच विद्यार्थ्यांच्या सहमतीनुसारच यंदाच्या गणेशोत्सवासह फटाके उडवण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली आहे. इतर नागरिकांनीही या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन फटाके मुक्त गणेशोत्सव साजरा केल्यास काही अंशी पर्यावरण प्रदूषण कमी होणार आहे.’
-स्नेहा घाटगे, प्राचार्या, मॉडर्न इंग्लिश स्कूल, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta