
सायंकाळी सार्वजनिक मंडळाची मूर्ती प्रतिष्ठापना; पारंपारिक वाद्यांचा गजर
निपाणी (वार्ता) : ऊन पावसाचा खेळ, भाविकांचा उत्साह, फटाक्यांची आतषबाजी आशा वातावरणात मंगळवारी (ता.१९) सकाळी घरगुती आणि सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आले. यावर्षीही डॉल्बीला व डीजेला बंदी असल्याने स्वागत मिरवणूक पारंपारिक वाद्याच्या गजरात पार पडली.
सकाळी ९ वाजल्यापासूनच येथील चाठे मार्केट, सटवाई रोड, नेहरू चौक, बेळगाव नाका राम मंदिर, साखरवाडी संत सेना भवन व कुंभार वाड्यात बाप्पांना घरी नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात पावसाची रिपरीप असतानाही अनेक भाविकांनी दुचाकी चार चाकी वाहनासह रिक्षातून बाप्पाला घरी नेले. त्यामुळे शहरातील विविध चौकात दुपारपर्यंत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वरील परिसरातील सर्वच रस्ते वाहनधारक आणि नागरिकांनी भरून गेले होते.
गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पाच फळे व उदबत्ती इतर नैवेद्य खरेदीसाठीही भाविकांनी रस्ते फुलून गेले होते. सकाळी ११ नंतर घराघरात घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर आरती व खिरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.सायंकाळी तीन नंतर शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्ती येण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली व इतर वाहनांचा वापर केला. रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या गणेश मूर्ती नेल्या जात होत्या. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन शहर ग्रामीण व बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे सर्वच चौक व रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता.
—————————————————————-
पारंपारिक वाद्यांचा गजर
प्रशासनाने यावर्षीही डीजे आणि डॉल्बीवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेकांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची आगमन मिरवणूक काढली. त्यानिमित्ताने शहर व ग्रामीण भागातील पारंपारिक वाद्य व्यवसायिकांना चांगले दिवस आल्याचे दिसून आले.
———————————————————————
केळी फळे महागली
घरगुती सह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पाच फळे व कच्च्या केळींची मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच रस्त्यासजह गणेश मूर्ती विक्री परिसरात कच्ची केळी आणि फळांचे स्टॉल लावले होते. कच्ची केळी ४० ते ५० रुपये डझन तर पाच फळे ८० रुपये प्रमाणे विकली जात होती. त्यामुळे भाविकांच्या खिशाला कात्री लागल्याचे जाणवत होते.
Belgaum Varta Belgaum Varta