विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड; लेखी आदेश नसल्याची सबब
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमा भागातून हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षणासाठी ये- जा करीत आहेत. त्यांच्यासाठी निपाणी आगारातून यापूर्वी बस पास दिले जात होते. पण काही महिन्यापासून कोल्हापूर आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी महाविद्यालय व इतर शिक्षण घेणाऱ्या कर्नाटकातील विद्यार्थ्यांची निपाणी आगारातील बस पास सेवा बंंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
निपाणी शहरासह ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध शहरात शिक्षणासाठी दररोज ये- जा करतात. पण त्यांना बस पास बंद केल्याने मोठी अडचण होत आहे.
सीमाभागातून आवश्यक असणारे शिक्षण अथवा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी, कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज भागातील महाविद्यालयात शिक्षणासाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांना आता बसपास मिळत नाही. याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी वारंवार संबधित आगार प्रमुखांना भेटून तक्रार करून देखील दखल घेतलेली नाही.
कोल्हापूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहा महिन्याचा बसपास खर्च फक्त रूपये १ हजार ५० इतका आहे. पण पास बंद केल्याने विद्यार्थ्यांना दररोज निपाणी – कोल्हापूर – निपाणी बस करीता १२८ रूपये इतका नाहक खर्च करावा लागत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी निपाणी आगारामध्ये चौकशी केली असता बंगळुर कार्यालयातून बसपास सुरू करण्यासाठी लेखी आदेश आला नसल्याची सबब सांगितली जात आहे.
——————————————————————–
‘महाराष्ट्रात शिक्षण व विविध प्रकारचे कोर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निपाणी आगारातून बस पास देणे बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे तात्काळ बस पास सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.’
-अशोक खांडेकर,
४ जेआर ह्युमन राईट केअर ऑरगेनायझेशन, जन संपर्क प्रतिनिधी
——————————————————————–
‘महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील बस पास देण्याबाबत अद्याप आदेश आलेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे बस पास बंद आहेत. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर बस पास वितरित केली जातील.’
-संगाप्पा, आगार प्रमुख निपाणी