सदाशिव पोवार; निपाणीत शेतकऱ्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : अनामत तत्वावर सोयाबीन घेऊन भिवशी येथील संजय भिमगोंडा पाटील या सोयाबीन व्यापाऱ्याने कोट्यावधी रुपयांचे सोयाबीन शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अनामत म्हणून दिलेल्या सोयाबीनची किंमत मागण्यास सुरुवात केल्यापासून संजय पाटील यांनी घराला टाळे ठोकून कुटुंबीयांसह पलायन केले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणी सापडले असून याबाबत लवकरच पोलीस ठाण्यात त्यांच्याबद्दल रीतसर तक्रार करून तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती सुळगाव येथील शेतकरी सदाशिव पोवार यांनी दिली. बुधवारी (ता.२०) येथील राम मंदिरात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, सोयाबीन दिलेल्या शेतकऱ्यांनी संजय पाटील यांच्या घरी शनिवारी (ता.१६) भेट देऊन दिवसभर त्यांची वाट पाहिली.पण ते घरी आले नाहीत. सायंकाळी गावातील काही नागरिकांनी संजय पाटील हे गाव सोडून गेल्याची माहिती देताच शेतकरी परत आले.
संजय पाटील यांनी सोयाबीनला रास्त भाव देणे, सोयाबीन खराब असेल तर शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान करणे, सोयाबीन खरेदीची किंमत शेतकऱ्यांच्या सोयीनुसार वेळेवर देणे, कधी आगाऊ रक्कम घेऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. गेल्या दोन वर्षापासून त्यांनी अनामत पद्धत सुरू करून सोयाबीनचा दर वाढल्यानंतर दिलेल्या पावतीप्रमाणे दर देऊन त्यांच्या सोयाबीन ची किंमत देण्याची पद्धत सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होत होता. परिणामी शेतकरी संजय पाटील यांना बोलावून घेऊन आपले लाखो रुपयांचे सोयाबीन देत होते.
पण गेल्या काही दिवसापासून रकमेची मागणी केली असता आपल्याला व्यवसायात तोटा झाला असून काही दिवसात रक्कम देत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी थांबूनही रक्कम मिळाली नाही शिवाय संजय पाटील यांनी घर सोडून पलायन केले आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांना दिलेले धनादेशही वठलेले नाहीत. सध्या त्यांचा मोबाईल बंद असल्यानेरकमेबाबत शंका येऊन आता शेतकऱ्यांनी एकजूट केली असून लवकरच संजय पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासह आंदोलन उभा करणार असल्याचे पोवार व शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी महादेव मगदूम, सूर्यकांत पोवार, धोंडीराम वनिरे, आप्पासो शेळके, आदर्श पलसे, मानसिंग देसाई, भीमराव पोवार, पांडुरंग डावरे, सचिन मिसाळ, प्रकाश पाटील, मदन माने, संतोष बिरंजे, सचिन कुणकेकर, एकनाथ जाधव, वैभव पाटील यांच्यासह निपाणी, भिवशी, सुळगाव मत्तीवडे, यरनाळ, अर्जुनी, करड्याळ आप्पाचीवाडी, बुदलमुख, मुगळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.