लक्ष्मणराव चिंगळे; माध्यमिक नोकर पतसंस्थेची सभा
निपाणी (वार्ता) : निस्वार्थी संचालक मंडळ आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची प्रगती होत आहे. त्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार करावेत. येत्या आर्थिक वर्षात 2 कोटी रुपये इतक्या ठेवींचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेचे संस्थापक लक्ष्मणराव चिंगळे यांनी सांगितले. येथील माध्यमिक शाळा नोकर व निवृत्त नोकर सहकारी पतसंस्थेची 27 वी वार्षिक सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बी. जी. खाडे होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष आर. जी. शिंदे यांनी, संस्थेचे भाग भांडवल 3 लाख रुपये, राखीव व इतर निधी 45 लाख, ठेवी 1 कोटी 10 लाख असून 87 लाख 68 हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. भांडवल 1 कोटी 86 लाख वार्षिक उलाढाल 4 कोटी 88 लाख असून संस्थेला अहवाल सालात 6 लाख 94 हजार रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना 9.5 टक्के इतका लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले.
सचिव प्रताप जाधव यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बी. जी खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षक सुदर्शन ठाणे-बेडकीहाळ, कल्पना चिंगळे-निपाणी, रमेश भैनाईक-निपाणी, भरत पाटील-मांगुर, बापूसाहेब परीट- अकोळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तसेच सुनिता कोगले यांना जिल्हा आदर्श शिक्षिका व लवाप्पा बिराजदार पाटील यांना तालुका उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.
सभेस संस्थेचे अध्यक्ष एस. डी. ठाणे, संचालक के. बी. झिपरे, एस. एस. आडके, आर. एस. भैनाईक, बी. डी. शिरोळे, एल. बी. बिरादार पाटील, एम. ए. जमदाडे, बी. आर. कोळेकर, एल. एस. रजपूत यांच्यासह सभासद उपस्थित होते. जे. एन. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.