
निपाणी परिसरातील चित्र; गणेशोत्सव देखाव्यांची परंपरा दुर्मिळ
निपाणी (वार्ता) : सळसळत्या उत्साहाचे प्रतीक मानाला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते. पण गेल्या काही वर्षापासून त्याऐवजी आकर्षक विद्युत रोषणाई, गणेश मूर्ती आणि महाप्रसादावर भर दिला जात असल्याचे चित्र निपाणी आणि ग्रामीण भागात दिसत आहे.
निपाणी भागातील सार्वजनिक गणेशोत्सवावर शेजारच्या कोल्हापूर आणि बेळगावची छाप आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी तर भाविकांच्या रांगा लागायच्या. ग्रामीण भागातून ग्रामस्थ बैलगाड्या करून देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी करत होते. त्यांचाच आदर्श घेऊन ग्रामीण भागातील नव्या मंडळांनीही देखावे साकारण्याची परंपरा जपली. चित्तवेधक देखावा उभारण्यासाठी विविध मंडळांतील कार्यकर्त्यांत कमालीची चढाओढ होती. तांत्रिकसह सजीव देखाव्याची प्रथा रुढ झाली होती.
घरगुती गणरायाचे विसर्जन झाले की सर्वजण मंडळाचे देखावे पाहायला नागरिक बाहेर पडत होते.दशकभरात ही पंरपरा कमी झाली आहे. पण, परंपरा लक्षात घेऊन आजही काही मोजक्या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविक आवर्जून गर्दी करतात. वाढलेली महागाई आणि उपलब्ध आर्थिक सुविधांच्या पार्श्वभूमीवर मंडळे यंदा या परंपरेकडे वळणार का, याचे औत्सुक्य आहे.
Belgaum Varta Belgaum Varta