निपाणी (वार्ता) : गेल्या दोन-तीन महिन्यापासून निपाणी शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. शनिवारी (ता.२३) येथील मुख्य बाजारपेठेत जुनी चावडी परिसरात एका जनावराने महिलेला जोराची धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाले आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी येथील बाजारपेठेत एक महिला भाजीपाला खरेदीसाठी आली होती. त्याचवेळी बाजारात फिरणाऱ्या एका मोकाट वळूने बाजूने जाणाऱ्या महिलेला जोराची धडक दिली. त्यामुळे ही महिला खाली कोसळली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेनंतर ही जनावरे कोठीवाले कॉर्नर परिसराकडे गली.
दर गुरुवारच्या आठवडी बाजारपेठेत या जनावरांची मोठी वर्दळ सुरु असून मिळेल ते खाऊन सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. दोन महिन्यापूर्वी अशा प्रकारे बाजारपेठेत नगरपालिका कर्मचाऱ्यावर मोकाट जनावरांनी हल्ला केला होता. त्यामध्ये तोही गंभीर जखमी झाला होता. तरीही नगरपालिका प्रशासनाने अद्याप मोकाट जनावराबाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या पुढील काळातील अशा घटना टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta