Monday , December 23 2024
Breaking News

बेळगावमध्ये ३ ऑक्टोबरला धनगर समाजाचे नववे अधिवेशन

Spread the love

 

लक्ष्मणराव चिंगळे; सिध्दरामय्यांचा होणार राष्ट्रीय सन्मान

निपाणी (वार्ता) : अखिल भारतीय राष्ट्रीय धनगर समाजाचे नववे अधिवेशन बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळवारी (ता.३) होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देशातील धनगर समाजबांधवातर्फे राष्ट्रीय सन्मान होणार आहे. यावेळी सुमारे दीड लाखांवर धनगर समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती धनगर समाजाचे माजी राज्याध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
यावेळी समाजाचे निपाणी तालुका अध्यक्ष आर. के. धनगर, प्रधान कार्यदर्शी महादेव कौलापुरे, उपाध्यक्ष श्रीकांत बन्ने, माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, अशोक आरगे, कार्याध्यक्ष एस. के. खज्जन्नावर, सत्याप्पा हजारे, कल्लाप्पा डोणे, सिद्धलिंग चिगरे, बाळासाहेब कोळेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
चिंगळे म्हणाले, यापूर्वी दिल्ली, गुजरात, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश या ठिकाणी आठ अधिवेशने या संघटनेच्यावतीने झालेली आहेत. नववे अधिवेशन हे कर्नाटकात बेळगाव या ठिकाणी ३ ऑक्टोबरला पार पडत आहे.
देशात सुमारे १२ कोटी लोकसंख्या धनगर समाजाची आहे.विविध राज्यात हा समाज बघेल, पाल, क्षत्रियपाल, गडारीया, कुरुमान, कुरुबम, कुरुबा, गोंडा, राजगोंडा, जेनु कुरूब, काडू कुरुब यासह विविध नावांनी ओळखला जातो. देशभर विखुरलेल्या या समाजाला एकत्र आणण्यासाठी २ ऑक्टोबर २०१४ मध्ये कर्नाटकचे माजी मंत्री एच. विश्वनाथ यांच्या अध्यक्षतेखाली शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल, नवी दिल्ली या संस्थेची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व राज्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधी या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
धनगर समाजाचे कागिनेले महासंस्थान कनकगुरू पिठाचे जगद्गुरु निरंजनानंदपुरी महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. त्याचबरोबर विभागीय कनक पिठाचे सिद्धरामानंद महास्वामीजी, शिवानंद महास्वामीजी, ईश्वरानंदपुरी महास्वामीजी यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी संपूर्ण देशात दौरा करून जागृती केली आहे. या अधिवेशनात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, केंद्रीय मंत्री एसपी सिंग बघेल, केंद्रीय मंत्री भागनसिंग कुलस्ते, कर्नाटकचे नगरविकास मंत्री भैरती सुरेश, आंध्रप्रदेशचे मंत्री उषा श्रीचरण, गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, गुजरातचे राज्यसभा सदस्य सागर रायकर, दिल्लीचे आमदार दिनेश मोहनिया, तेलंगणाचे आमदार ए. के. मल्लेशम, महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर, प्रा. राम शिंदे, आमदार दत्तात्रय भरणे, गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर तसेच देशातील विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागत समितीचे अध्यक्ष पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे असणार असून कार्याध्यक्ष म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या काम पाहणार आहेत. यावेळी कर्नाटक प्रदेश धनगर संघ, कर्नाटक प्रदेश धनगर महासभा, कर्नाटक हालमत समाज यांच्यासह सर्व धनगर समाज संघटना सहभागी होणार असून समाजबांधवांनी यावेळ उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले.
—————————————————————-
दोन ठराव मांडणार
सदर अधिवेशनात विविध ठराव मांडले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाला अनुसूचित जाती अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून त्याची केंद्राने ताबडतोब अंमलबजावणी करावी तसेच गेल्या ५० वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यात राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बेळगाव आणि चिकोडी यापैकी एका मतदारसंघात धनगर समाजाला उमेदवारी द्यावी असा ठराव मांडला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक

Spread the love  जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *