निपाणी (वार्ता) : ग्राहकांना कोणतीच माहिती नसताना दोघा ग्राहकांच्या खात्यातून २१ हजाराची रोकड लंपास झाल्याची घटना शनिवारी (ता.३०) घडली. याबाबत सायबर क्राईम विभागाकडे ग्राहकांनी तक्रार केली आहे. या घटनेमुळे बँक ग्राहकातून भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत ग्राहकांनी सांगितलेली अधिक माहिती अशी, सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शिरगुप्पी येथील किरण पाटील यांच्या बँक खात्यातून दहा हजाराची रक्कम काढल्याचा संदेश आला. त्यामुळे आपण रक्कम काढली नसताना संदेश आल्यामुळे त्यांनी तात्काळ आपले बँक खाते बंद केले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर रात्री उशिरा याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
दुसऱ्या एका घटनेमध्ये येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील एका ग्राहकाची अशाच प्रकारे दहा हजाराची रक्कम काढल्याचा संदेश आला. त्यामुळे या ग्राहकांनी बँकेत याबाबत चौकशी केली. पण त्याबाबत कोणतीच माहिती मिळू शकली नाही. एकंदरीत एकाच दिवशी दोन ठिकाणी रक्कम लंपास करण्याच्या घटना घडल्याने नागरिकांत भीती व्यक्त केली जात आहे.