
आडी डोंगराजवळ होणार प्रारंभ; शेतकऱ्यांची थांबणार पिळवणूक
निपाणी (वार्ता) : वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या बारमाही पाण्यामुळे ग्रामीण भागातील शेतीचे तंत्रज्ञान बदलले आहे. नगदी पिकाबरोबरच या भागातील अनेक शेतकरी भाजीपाला पिके घेत आहेत. पण बाजारपेठेत त्याची विक्री करताना व्यापारी व अडतांना किमान दहा टक्के कमिशन द्यावे लागते. शिवाय कवडी मोलाने हा भाजीपाला खरेदी केला जातो. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी भिवशी येथील युवा शेतकरी लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मल्लिकार्जुन डोंगराच्या पायथ्याशी सोमवारपासून (ता.१६) शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी घाऊक भाजीपाला मार्केट सुरू होणार आहे. त्यामुळे यापुढे काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
येथील भाजीपाला मार्केटमुळे शेतक-याकडून व्यापारी वर्गाला देण्यात येणाऱ्या कमिशन पासून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःचा माल स्वतः विकण्याची मुभा या मार्केटमध्ये दिली जाणार आहे.
शिवाय घावुक व्यापाऱ्यांना ताजा व थेट शेतातून आलेला ताजा भाजीपाला उपलब्ध होईल.
आडी मल्लिकार्जुन डोंगराच्या पायथ्याशी बस स्थानकाला लागूनच मार्केट होणार असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे मार्केट आठवड्यातील सर्वच दिवस सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. पालेभाज्या बरोबर कांदे, बटाटे व फळेही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. निपाणी भागातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणारे विना कमिशन असणारे हे पहिले मार्केट आहे. कमिशन नसल्यामुळे घावून व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबून ग्रामीण भागातील सर्वसामान्य भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
——————————————————————

‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भाजीपाला मार्केट आडी मलय्या डोंगराच्या पायथ्याशी सुरु करण्यात येत आहे. भाजीपाला शेतकरी स्वतः येवून येथे लहान व्यापाऱ्यांना थेट विकू शकतात. कोणतेही कमिशन देण्याची गरज नाही. सुरज पाटील, संदेश पाटील या होतकरू मुलांनी शेतकऱ्यांसाठी चांगलानिर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ मार्गदर्शन करीत आहेत.’
-लक्ष्मीकांत पाटील,
युवा शेतकरी भिवशी (ता. निपाणी)
Belgaum Varta Belgaum Varta