
बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात एकूण 43 हजार पेन्शनधारक नागरिक आहेत. यापैकी 1200 हून अधिक नागरिकांनी पेन्शन जमा होत असलेल्या बँक अथवा पोस्ट खात्याला आधार कार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळेच अनेकांची पेन्शन जमा न झाल्याच्या तक्रारी आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असून यापुढे आधार कार्ड लिंक नसल्यास संबंधित नागरिकाला पेन्शन मिळणार नाही. किंबहुना सदर नागरिक अपात्र असल्याचे समजून पेन्शन योजना बंद करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी दिला आहे.
राज्य सरकारकडून वयोवृद्ध, विधवा, निराधार, दिव्यांग अशा तसेच केंद्र सरकारकडूनही विविध पेन्शन सुविधांचा लाभ मिळवून दिला जातो. निपाणी तालुक्यात 43 हजाराहून अधिक नागरिकांच्या खात्यावर डीबीटी अर्थात थेट रक्कम हस्तांतरणच्या माध्यमातून पेन्शन जमा होते. सरकारकडून बोगस लाभार्थी टाळण्यासाठी पेन्शन जमा होणाऱ्या खात्यांना आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अजूनही तालुक्यातील 1200 वर नागरिकांनी आपले खाते आधारशी लिंक केलेले नाही. त्यामुळे यापुढे त्यांना पेन्शन सुविधेचा लाभ मिळणार नाही. यासंदर्भात जागृती करण्याच्या सूचनाही तलाठ्यांना दिल्या आहेत.
बँक खात्याला आधार लिंक करण्यात अडचणी असतील तर अशा नागरिकांनी पोस्ट कार्यालयात नवीन खाते सुरु केले तरी त्यांना पेन्शन सुविधा मिळवून देण्यात येईल. त्यामुळे आधार लिंक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन तहसिलदार बळीगार यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta