
२४ तासात खुनाचा उलगडा
निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने येथील हौसाबाई सावंत कॉलनी मधील राहुल उर्फ आनंद शिवाप्पा सुभानगोळ या युवकाचे अपहरण करून त्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) उघडकीस आली होती. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी २४ तासात संशयित आरोपी कौस्तुभ अमोल औंधकर (वय २१, रा. मुगळे गल्ली, निपाणी) व शैलेश संभाजी बोधले (२३, रा. बालाजी नगर, निपाणी) या दोघांना जेरबंद केले आहे. त्या दोघांनीही दोन लाख रुपयाच्या देवाणघेवाणीवरूनच राहुलचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी गुरुवारी (ता.५) दुपारी दिली.
मंडल पोलीस निरीक्षक तळवार म्हणाले, मसोबा हिटणी (ता. हुकेरी) येथील राहुल सुभानगोळ हा वर्षापासून येथील साखरवाडी हौसाबाई सावंत कॉलनीमध्ये कुटुंबीयासमवेत वास्तव्यास होता. त्याची येथील शैलेश बोधले या युवकाशी मैत्री झाली होती. त्यातूनच त्याने राहुलकडे दोन लाख रुपये उसने रक्कम मागितली होती. त्यानुसार राहुलने आपला वेंगुर्ले येथील मित्राकडून दोन लाख रुपये आणून बोधले याला दिले होते. पण चार महिने उलटले तरीही रक्कम परत न मिळाल्याने राहुल हा वारंवार बोधले याच्याकडे पैशासाठी तगादा करत होता.
दिलेले पैसे परत द्यावे लागणार असल्याच्या भीतीनेच शैलेश बोधले यांने आपला मित्र कौस्तुभ औंधकर याला हाताशी धरून राहुलच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार सोमवारी (ता.२) सायंकाळच्या सुमारास बोधले आणि औंधकर या दोघांनी राहुलच्या घरी भेट देऊन आपली रक्कम परत देणार असून कोल्हापूरला जावे लागेल असे सांगितले. त्यानुसार होंडा एक्टिवा स्कूटरवरून तिघेही कोल्हापूरच्या दिशेने गेले. पण रात्री उशिरापर्यंत राहुल परत न आल्याने त्याची पत्नी रेणुका हिने शहर पोलिसांना पतीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
रात्री भुदरगड किल्ला परिसरात जाऊन संशयीत दोघा आरोपींनी राहुलच्या मानेसह हातावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह किल्ल्याच्या शेजारीच असलेल्या दरीत फेकून तिथून पसार झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नी रेणुका हिने पुन्हा आपल्या पतीचा खून झाल्याची फिर्याद निपाणी पोलिसात दाखल केली.
दरम्यान सायंकाळी आरोपींनी स्वतः कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात स्वतःच हजर होऊन खुनाची माहिती दिली. त्यानंतर निपाणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता रक्कम परत द्यावी लागणार असल्याने राहुलचा खून केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार दोघा संशयित आरोपी विरोधात कलम ३६४,३०२ आयपीसी आणि कलम ३(२) कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्याकडून कुणासाठी वापरण्यात आलेली दुचाकी व एक चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. सध्या दोघा संशयतांना न्यायालयीन कोठडी दिली असून लवकरच पोलीस कोठडी घेऊन अधिक चौकशी केली जाणार असल्याचे तळवार यांनी सांगितले. वरील संशयित आरोपींनी यापूर्वी आणखी काही गुन्हे केले आहेत का याची चौकशीही आता होणार आहे.
चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक डॉ. गोपालकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीस प्रमुख एम. वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका, उमादेवी, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल व सहकाऱ्यांनी तपास कार्यात सहभाग घेतला. केवळ २४ तासात या खुनाचा उलगडा झाल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांनी पथकाच्या कार्याचे कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta