Monday , December 8 2025
Breaking News

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बोरगावात गर्भवतीचा मृत्यू

Spread the love

 

नातेवाईकांचा आरोप : घेराओ घालून कारवाईची मागणी

निपाणी (वार्ता) : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांना दवाखान्यासमोर आंदोलन करून डॉक्टरवर कारवाईचा मागणी केली. बोरगाव (ता.निपाणी) येथे ही घटना घडली. शेजल अनिकेत माळी (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या मृत्यूला डॉ. महावीर बंकापुरे जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक प्रदीप माळी यांच्यासह नातेवाईकांनी केला.

शेजल माळी यांना प्रसूतीसाठी बंकापुरे यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. डॉ. बंकापुरे यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. पण त्या महिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने डॉक्टरांनी प्रसूती अर्ध्यावरच सोडत महाराष्ट्रातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी स्वतःहून हलविले.
अपुऱ्या साधनसामग्रीने प्रसूतीसाठी केलेल्या प्रयत्नामुळे इन्फेक्शन होऊन शेजलचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे पती अनिकेत यांनी केला आहे.
प्रसूतीवेळी गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना समजताच संतप्त कुटुंबीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांसमवेत दवाखान्याला घेराव घातला. गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल करत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा दवाखान्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिलेचे नातेवाईक व नगरसेवक प्रदीप माळी यांनी दिला. यावेळी नगरसेविका शोभा हवले, वर्षा मनगुते, भारती वसवाडे यांच्यासह अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
——————————————––———————-

‘कोणतीही पदवी नसताना खासगी दवाखान्यात प्रसूती करणे हे चुकीचे आहे. गंभीर परिस्थिती असताना बंकापुरे हे कोणत्या आधारावर प्रसूती करत आहेत, याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
-डॉ. भागाई, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिकोडी.
————————————————–——————

‘घटनेची माहिती आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून संबंधित दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. यापुढे खासगी रुग्णालयात प्रसूती होऊ नये, याची काळजी घेण्यात येईल.
-डॉ. विलोल जोशी, आरोग्याधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरगाव.
———————————————––——————-
‘आपण सुमारे ५ हजारपर्यंत प्रसूती केल्या आहेत. सदर महिलेच्या प्रसूतीवेळी तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यामध्ये दाखल केले. कोणाचे नुकसान करण्याची आपली भावना नाही.’
-डॉ. महावीर बंकापुरे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *