राजू शेट्टी : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
निपाणी (वार्ता) : गतवर्षी एफआरपीवर आधारित ऊस दराची मागणी केली होती. मात्र त्यानंतर बाजारपेठेत साखरेचे दर ३२०० ते ३८०० वर पोचल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रति टन चा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे. याशिवाय इथेनॉल पासूनही कारखान्यांना जादा रक्कम मिळाली आहे. त्यामुळेच ४०० रुपयांची मागणी केली असून त्यासाठी आता सोमवारी (ता.९) कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यातर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ही मागणी मान्य केल्यास यंदाच्या हंगामातील ऊस तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. येथील शासकीय विश्रामधामात शनिवारी (ता.७) सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
खासदार शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकामध्येही आंदोलन सुरू झाले आहे. त्याला घटक राज्य रयत संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. कागवाड, उगार, चिकोडी, निपाणी, रायबाग, संकेश्वरसह इतर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प राबविले आहेत. त्यातूनही साखर कारखान्यांना वाढीव रक्कम मिळाली आहे. तरीही शेतकऱ्यांना प्रतिटन चारशे रुपये देण्यास साखर कारखाने तयार नाहीत. त्यांना जाब विचारण्यासाठीच या मोर्चाचे आयोजन केले आहे. यंदाच्या हंगामातील उसाचा दर हा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये ठरवला जाणार आहे. शिवाय यावर्षी अत्यल्प पाऊस व खतांच्या दरवाढीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. शासनाच्या दूटप्पी धोरणाचा बीमोड करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे लढा दिला पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने घातलेली आंतरराज्य ऊस बंदी स्वाभिमानी संघटनेने केवळ तीन दिवसातच उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडणी देण्यासाठी गडबड करू नये. बेळगावच्या मोर्चा बाबत कर्नाटक आणि महाराष्ट्रातही जनजागृती केली असून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक यामध्ये सहभागी होणार आहेत. साखर कारखानदारांची मानगुट पकडण्यासाठी बेळगाव मधील मोर्चामध्ये सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही शेट्टी यांनी केले.
प्रा.एन. आय. खोत यांनी स्वागत केले. बैठकीस संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानावर, रावसाहेब झिणगे, तात्यासाहेब पाटील, बाबासाहेब मगदूम, सुरज रांगोळे, रमेश मगदूम, विकास समगे, मल्लाप्पा तावदारे, अय्याज पठाण, प्रमोद निर्मळे यांच्यासह सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.