
मंडप उभारणीची कामे सुरू: विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवाला केवळ एक आठवडा शिल्लक असल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे जोमाने तयारीला लागली आहेत. अनेक ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. दुर्गा मातेच्या सजावटीची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे.
दुर्गा मातेच्या आगमनासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते उत्साहाने रात्रीदेखील जागून काम करताना दिसत आहेत. एकीकडे दुर्गा माता मूर्ती घडविणारे मूर्तिकार अखेरचा रंगाचा हात मूर्तीवर फिरताना दिसत आहेत. अनेक मंडळींची मूर्तीसाठीची बुकिंग झालेली आहे. आता वेळ कमी असल्याने सार्वजनिक मंडळांसह गणेशमूर्तिकार देखील झटून कामाला लागले आहेत.
शिवाजीनगर,प्रगतीनगर, नरवीर तानाजी चौक, अशोक नगरसह इतर भागांमध्ये दुर्गोसवाची तयारी जोरात सुरू आहे. यंदा नव्याने अनेक मंडळां मध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन ताडपत्री, प्लास्टिकच्या आधाराने मंडप उभारणीची कामे करण्यात येत आहे.
यावर्षीही गणेशोत्सवामध्ये डॉल्बी अथवा मोठ्या आवाजात वाद्य लावल्यास प्रशासनाने बंदी घातली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदाही पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गा मूर्तींचे आगमन होणार आहे.
——————————————————————–
मंदिरांची स्वच्छता सुरू
नवरात्र उत्सव आणि दसरा जवळ आल्याने घरांसह मंदिरांची स्वच्छता आणि रंगरंगोटी सुरू झाली आहे. येत्या चार दिवसात ही कामे पूर्ण झाल्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta