निपाणी तालुक्यातील अनेक गावात बंद : पुतळा विटंबनेचा निषेध
निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या विटंबने निषेधार्थ येथील सर्वपक्षीय नेते मंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी सोमवारी (ता. 20) शहरात मूकमोर्चा काढला. त्यामध्ये शहरातील दहा हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर दोन्ही घटनेतील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. मोहन भस्से यांना दिले. मुकमोर्चापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास युवतींच्या हस्ते जल व दुग्धाभिषेक घालून घोषणांनी शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला. तसेच अक्कोळ क्रॉसवरील संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तालुक्यातील बेडकिहाळ, जत्राट, सौंदलगा, कोगनोळी, मांगूर, कारदगासह अनेक गावातही बंद पाळून पुतळा विटंबनेचा निषेध करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
सकाळी 9 वाजल्यापासूनच शहर, उपनगरातील शिवप्रेमी व संगोळ्ळी रायण्णाप्रेमी भगवे ध्वज घेऊन शिवाजी चौकाकडे गटागटाने येत होते. त्यामध्ये बालचमूसह युवकांचा सहभाग लक्षणीय होता. सकाळी 10 वाजता पौरोहित्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक पुतळ्याजवळ विधीवत पूजा झाली. श्रीमंत दादाराजे देसाई, विजयराजे देसाई व मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, राष्ट्रमाता जिजाऊ की जय अशा घोषणा देऊन ध्येयमंत्र सादर केला. त्यानंतर चाटे मार्केटमार्गे नगरपालिका कार्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढला. येथे बालशिवाजी व प्रमुख नेतेमंडळींच्या हस्ते तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन दिले.
दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणार्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजासाठी कार्य केले आहे. तर संगोळ्ळी रायण्णा यांनी ब्रिटीशांच्या विरोधात लढा दिला होता, अशा महान क्रांतीकार पुतळ्यांची विटंबना करणे चुकीचे आहे. त्यासाठी शासनाने योग्य नियोजन करून घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करावी. यापुढील काळातही कायदा व सुव्यवस्था राखून अशा घटना टाळावी अशी मागणी निवेदनात केली. सदरचे निवेदन तहसीलदारामार्फत राज्यपालांना पाठविले.
मोर्चात माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन पाटील, आजी-माजी नगराध्यक्ष, नगसेवक, शिवप्रेमी व विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
——–
तंबाखू दराच्या मोर्चानंतरचा मोठा मोर्चा
तंबाखू दर आणि मजुरांना चांगली मजुरी मिळावी यासाठी 1981 साली ऐतिहासिक मोर्चा निघाला होता. त्यानंतर सर्वपक्षीय काढलेला आज सोमवारी (ता. 20)चा मोर्चा ठरला. त्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.
———-
पोलिसांचा बंदोबस्त
शहरातील प्रमुख मार्गावरून निषेधासाठी मूकमोर्चा काढण्याचे नियोजन सर्वपक्षीय बैठकीत केले होते. पण अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, पोलिस उपाधिक्षक मनोजकुमार नायक, मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून शहरातील सर्व मार्गाऐवजी मध्यवर्ती चौकातून थेट तहसीलदार कार्यालयापर्यंतच मूकमोर्चाला परवानगी दिली.
———
कडकडीत बंद
छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या विटंबना निषेधार्थ मूकमोर्चाबाबत बैठक घेऊन सर्वपक्षीय मंडळींनी सोमवारी निपाणी बंदची हाक दिली होती. त्याला शहरातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे बंद कडकडीत झाला. यावेळी शहरातील रिक्षा, हॉटेल, कापड, किराणा, भांडी दुकान, सराफ व्यावसायिकांनी बंदला यशस्वी केला. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट पसरला होता.
Check Also
निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
Spread the love आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …