निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संगीता शिवानंद चिक्कमठ त्यांच्या दोन्ही मुली अंकिता व अर्पिता यांचा वाढदिवस कर्णबधीर मुलांसोबत साजरा करत त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. निपाणीतील सावंत कॉलनीतील नितीनकुमार कदम कर्णबधीर विद्यालय येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नामदेव चौगुले हे होते.
मुख्याध्यापिका पंकजा कदम यांनी स्वागत केले. यावेळी नामदेव चौगुले म्हणाले, समाजात अनेक श्रीमंत व्यक्ती असून समाज कार्यासाठी त्यांच्याकडून एक रुपया सुद्धा खर्च करण्याचे धाडस होत नाही. मात्र चिकमठ दाम्पत्याने मतिमंद, कर्णबधीर मुलांसोबत आपल्या मुलींचा वाढदिवस साजरा करून त्यांना स्नेहभोजनाची मेजवानी दिली आहे. असा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले.
संगीता चिक्कमठ म्हणाल्या आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवण्याचा निर्णय घेतला असून यापुढे सुद्धा आपल्या परीने समाजसेवा करत राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी नरजीत विटे, किरण मेस्त्री, संजय कांबळे, बाबासाहेब कांबळे, यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शअंजना कांबळे, मनीषा कदम, शिवानंद चिक्कमठ, स्नेहा कांबळे आकाश कांबळे, संतोष जाधव, यांच्यासह नितीन कुमार कदम कर्णबधीर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सुनीता कांबळे यांनी आभार मानले.