अपघाताला निमत्रंण : ट्रॉलीला धडकून अनेकांनी गमावले प्राण
निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. सर्वच रस्त्यावर रात्री अपरात्री ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक सुरू आहे. अनेक वेळा पोलिसांनी आवाहन करूनही निपाणी भागात बहुसंख्य ट्रॅक्टर हे रिप्लेक्टर शिवाय धावताना दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे अनेक दुचाकीस्वारांना प्राणांना मुकावे लागले आहे.
निपाणी सीमाभागात 8 ते 10 साखर कारखाने आहेत. शहरातून जाणार्या महामार्गावरून तसेच शहरातील मध्यभागी समजल्या जाणार्या चिकोडी रोड, मुरगुड रोड, बेळगाव नाका, कोल्हापूर वेस रोड परिसरात सतत ऊस वाहतूक सुरू असते. पोलीस खात्याने अनेक वेळा आवाहन करूनही अनेक ट्रॅक्टरचालक बेफिकीरपणे रिप्लेक्टरशिवाय दोन-दोन ट्रॅलीमधून ऊसाची वाहतूक करतात. अनेकदा मागील बाजूस ऊस लोबंकळत असल्याने रिप्लेक्टर असले तरी मागील वाहनांना दिसणे अशक्य होते. ट्रॅक्टरची मागील बाजू जुनी झाल्याने किंवा कोणत्याही प्रकारचे रेडियम, लाल दिवे अथवा रिप्लेक्टर लावलेले नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. तिकोडीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा हाकनाक बळी गेला आहे. भर रस्त्यावर बंद पडलेली ऊस वाहतुकीची वाहने उभी केली जातात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना देणारी व्यवस्था नसल्याने दरवर्षी कित्येकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
—————
वाहतूक खाते असफल अन् ट्रॅक्टर चालकांची बेफिकीरी
मागील अनेक दिवसांपासून कारखाने सुरू होण्याच्या सुरवातीला पोलिस ऊस वाहतूक कारणार्या वाहनचालकांच्या जनजागृती शिबिराचे आयोजन करते. अनेकदा कापडी रिप्लेक्टरचे वाटप केले जाते. एक दोन दिवस ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला हे कापडी रिप्लेक्टर दिसतात. मात्र काही दिवसातच वाहनचालकांची बेफिकीरी वृत्तीमुळे पुन्हा रिप्लेक्टर शिवायची ऊस वाहतूक सुरू होते. ट्रॅक्टरमालकांना तसेच कारखानदारांना मोठ्या रकमेची दंड आकारणी केल्याशिवाय या विनारिप्लेक्टर वाहतूक बंद होणार नाही.
—————
दरवर्षीची समस्या
अंधारात भर रस्त्यावर ऊसाने भरलेली ट्रॅली सोडून दुसरी ट्रॉली आणण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर परत येईपर्यंत भर रस्त्यावर उभी केलेल्या ट्रॅलीची दुचाकीस्वारांना कल्पनाही येत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना दर्शक यंत्रणा नसल्याने वेगात आलेल्या दुचाकीस्वारास अचानक समोर उसाने भरलेली ट्रॅली दिसते तेव्हा दुचाकीचालकांसमोर कोणातच पर्याय नसतो. उभ्या ट्रॅलीला धडकून दरवर्षी सात ते दहा जणांना प्राण गमावावे लागतात.
—————
’दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रॅक्टर ट्रॉलीला रिप्लेक्टर राहण्याबाबत सर्वच वाहनधारकांमध्ये जनजागृती केली आहे. तरीही रिप्लेक्टर न लावता वाहक आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.’
– संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta