
सायंकाळी विधिवत प्रतिष्ठापना; पारंपारिक वाद्यांचा गजर
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात रविवारी (ता.१५) सायंकाळी घरोघरी घटस्थापना करण्यात आली. त्याबरोबरच नवरात्र उत्सव मंडळांनी ‘जय अंबे’च्या गजरात पारंपारिक वाद्यांसह दुर्गा माता मूर्तींची आगमन मिरवणूक काढून मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना केली. यावेळी दत्त गल्लीतील दक्षता तरुण मंडळातर्फे हलगी वादन, घोडा, मर्दानी खेळ, धनगरी ढोल आणि कीर्तनकारांच्या समवेत आगमन मिरवणूक काढली.
शहरातील अनेक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याशिवाय आठवडाभर दांडिया आणि गरबा खेळांची धूम पाहायला मिळणार आहे.

येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यातील प्रति तुळजाभवानी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांनी दिली. रविवारी(ता.१५) पहाटे सनई चौघड्याच्या निनादात उत्सवाला सुरुवात झाली. तुळजाभवानी मूर्तीला अभिषेक घालून घटस्थापना व दीपमाळ यांची पूजा श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते झाली. गुरुवारी (ता.१९) ललित पंचमी असून देवीचा कुंकूमार्चन विधी होणार आहे. शनिवारी (ता. २१) जोतिबाचा चौक मांडून जागर होणार आहे. रविवारी (ता.२२) अष्टमीनिमित्त तुळजा भवानीस अभिषेक घालण्यात येणार आहे. याशिवाय श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ वालुंग कार्यक्रम आयोजित केला आहे.
सोमवारी (ता.२३) खंडे महानवमी शस्त्रपूजा होणार आहे. त्यानंतर देव उठवण्याचा कार्यक्रम होईल. श्रीमंत दादाराजे निपाणकर हे मानाचे ५ घरामध्ये जोगवा मागून राजवाड्यामधील पालखी शस्त्र पूजनासाठी बाहेर काढली जाणार आहे. त्यानंतर नवचंडी होम व रेणुकाचा लिंब नेसण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री तुळजाभवानीचा चौक मांडून गोंधळ आयोजित केला आहे.
यंदा विजयादशमी मंगळवारी (ता. २४) रोजी आहे. सायंकाळी ५ वाजता रेणुका मंदिरासमोर सोने लुटायचा कार्यक्रम होणार आहे. रविवार पेठ येथील निपाणी निवासिनी महालक्ष्मी देवीची रोज विविध रुपात पूजा मांडली जाणार आहे. याशिवाय सायंकाळी सार्वजनिक आरती व हळदी-कुंकू कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta