
३.८१ लाखाचा मुद्देमाल जप्त: निपाणी पोलिसांची कारवाई
निपाणी (वार्ता) : नदीकाठावरील विद्युत मोटरी आणि दुचाकी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना निपाणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दीड लाखाच्या पाच दुचाकी आणि २.३१ लाखाच्या सात विद्युत मोटारी जप्त केले आहेत. अभिजीत रामू कोगले( वय २३ रा. नांगनूर( ता.निपाणी) आणि बाबू गंगाराम नाईक (वय २० रा. हडलगा ता. हुक्केरी, सध्या रा. औद्योगिक वसाहत श्रीपेवाडी) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, काही दिवसापूर्वी जत्राट वेदगंगा नदी परिसरातील रमेश जबडे, संतोष शिरोळे, वसंत जबडे, दत्ता वडगावे, मनोहर अडीपवाडे या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीस गेल्या होत्या. त्याबाबत शेतकऱ्यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी या चोरींचा सुरू केला होता.
संशय दोघा आरोपीवर पोलिसांनी नजर ठेवली होती. त्यानुसार विद्युत मोटारीचे चोरी करताना त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता चैनीसाठी वेदगंगा नदी काठावरील पाच विद्युत मोटारी चोरी केल्या होत्या. याशिवाय कागल तालुक्यासह चिकोडी यमगर्णी येथील सात दुचाकीही लांबवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, सहाय्यक उपनिरीक्षक आर. जी. कुंभार, हवालदार एम. आर. कांबळे, एम. ए. तेरदाळ, आर. बी.पाटील, एस. एस. कोकणी, श्रीशैल गळतगी, जे. पी. संगोडी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
—————————————————————
चैनीसाठी चोरी
चोरी प्रकरणातील संशयित आरोपी अभिजीत कोगले हा शर्यती शौकीन असून त्याची मैत्री बाबू नाईक यांच्याशी झाली होती. हे दोघेही चैनीसाठी दुचाकी आणि विद्युत मोटारी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta