
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची काकासाहेब पाटील यांनी घेतली भेट
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यामध्ये अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निपाणी तालुक्यात लक्ष घालून अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी निधी मंजूर करावा. याशिवाय वेदगंगा नदीवरील भोज- कारदगा या बंधारावर आणखी तीन कमानी निर्माण कराव्यात,या मागणीबाबत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बेळगाव येथे भेट घेऊन निवेदन देण्यासह चर्चा केली.
यावर्षी निपाणी भागात पावसाची अवकृपा झाली आहे. त्यामुळे सध्या पिण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दसरा आणि दिवाळी सण जवळ येऊन ठेपला आहे. पण खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. अशावेळी सरकारने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे ही समाधानकारक बाब आहे. आता तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करुन ती शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करावी.
वेदगंगा नदीवरील भोज -कारदगा दरम्यान पूल वजा बंधारा बांधला आहे. या ठिकाणी भराव टाकल्यास पावसाळ्यात बॅक वॉटर येऊन शेतीसह इतर मालमत्तेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे येथे अद्याप तीन कमानी बांधणे आवश्यक असल्याचे काकासाहेब पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, पाणीसमस्या निवारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे केंद्राचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाले असले तरी राज्य सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यास तयार आहे. लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्याबाबत संबंधित संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असे सांगितले. याशिवाय मतदारसंघातील विविध विकास योजनांबाबत यावेळी चर्चा झाली.
Belgaum Varta Belgaum Varta