
निपाणी (वार्ता) : जनवाड येथील श्री महादेव स्वामी धर्मर मठाच्या देवाचे कोतवाल अश्वाचे गुरुवारी (ता.१९) निधन झाले. कन्हैया नामक आश्र्वाच्या निधनामुळे जनवाड गावासह भाविकांवर शोककळा पसरली आहे.

जनवाड धर्मर मठात देव पूजेसाठी असणाऱ्या कोतवालांना विशेष असे महत्त्व आहे. दिवसातून चार वेळा या कोतवालांची पूजा केली जाते. मठात जागृत दैवत महादेव स्वामी नंतर पूजेचा मान या कोतवालांना दिला आहे.त्यामुळे मानकरींच्या व पुजाऱ्यांच्या हस्ते दररोज या कोतवालांची दिवसातून चार वेळा पूजा केली जाते. प्राचीन काळी महादेव स्वामी यांच्याबरोबर कोतवाल हे सुद्दा धर्म प्रचारासाठी भागभागतून फिरवले जात असल्यामुळे जनवाड मठात कोतवालांचे कायम वास्तव्य आहे.
कन्हैया नावाचे हे मठातील आजपर्यंतचे १८ वे अश्व कोतवाल आहे. सदर कोतवालाला हुबळी येथील कदम भक्तांनी १९९७ साली मठास दान स्वरूपात दिले होते. सहा महिन्याच्या इवलाशा कोतवालाला श्री क्षेत्र पंढपूर हून जनवाड धर्मर मठात आणून नंतर या कोतवालाचा पट्टाभिषेक करून त्याचे नाव कन्हैया असे ठेवण्यात आले होते. तेंव्हा पासून आजतागायत हा कोतवाल गेल्या २३ वर्षापासून जनावाड मठातच पूजेस असून कर्नाटक,आंध्र व महाराष्ट्रात धर्मप्रचार करीत मानकऱ्यान सोबत ही फिरला होता.
निधनानंतर या कोतवालाची मठ मंदिर परिसरात प्रदक्षणा घालून देवाच्या कोतवालाची विविध वाद्यांच्या गजरात शेकडो भक्तांच्या सहभाने मिरवणूक काढण्यात आली व शेवटी मठाच्या परिसरात या सजविलेल्या कोतवालाला दफन करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta