निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऊसाच्या गळीत हंगामाच्या काळात अनेक कारखान्याकडून ऊसाची काटामारी होत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांसह रयत संघटनेने साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यानुसार बैठक होऊन बैठक होऊन सर्वच कारखाना कार्यस्थळावरील स्थळावरील ऊस वजन काट्याची पडताळणी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या समवेत निपाणी आणि परिसरातील कारखान्यांच्या वजन काट्यांची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांच्या ऊसाची काटामारी थांबणार असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या कारखान्यांच्या वजन काटांची चौकशी आणि पडताळणी होत असली तरी यापुढील काळात निरंतरपणे अशा प्रकारची चौकशी होत राहणार आहे. अशावेळी वजन काट्यामध्ये दोष आढळल्यास संबंधित कारखान्यावर कारवाई होणार आहे. शनिवारी (ता.२१) रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत येथील हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट स्टेट आणि बेडकीहाळ येथील व्यंकटेश्वरा साखर कारखान्यावर वजन काट्याची पडताळणी करण्यात आली. सदरचे वजन काटे व्यवस्थित असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
साखर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि दर जाहीर करूनच कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा. अन्यथा साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी वजन काटा तपासणी अधिकारी आर. टी. बसरगुंडी, रयत संघटनेचे बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, सागर पाटील, रोहन नलवडे, दादासाहेब चौगुले, प्रवीण जनवाडे, प्रशांत कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.