
निपाणी (वार्ता) : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्यावी तसेच हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळाल्याच्या घटना जिल्ह्यात अनेक ठिकाणी घडल्या. याचा पंचनामा होऊनदेखील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता.२७) हुबळी येथील हेस्कॉमच्या मुख्य कार्यालयावर रयत संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात रायबाग येथे जागृती करण्यात आली.
रायबाग येथील शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दोन महिन्यात नुकसान भरपाई देण्यासह सुरळीत वीज पुरवठ्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र त्याकडे अजूनही दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र वितरण करण्यात आले. बैठकीस महादेव होळकर, मायाप्पा लोकरे, बिराप्पा बन्ने, मायाप्पा होळकर, तालुका अध्यक्ष रामन्ना शिरगुरी, श्रवणकुमार देवमानी, भीमाप्पा अळगुंडी, मारुती पाटील, हालप्पा अंकलगी, महादेव शेलार यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta