
शुक्रवारी भर उरुस ; हजारो भाविक दाखल
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांचा उरूस गुरुवारी (ता.२६) ते शनिवार (ता.२८) अखेर साजरा होणार आहे. उरूसानिमित्त चव्हाण घराण्याकडून दर्ग्यात चुना चढविण्याचा विधी पार पाडून ऊरूसाला गुरुवार (ता.२६) पासून प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविक दाखल झाले आहेत.
येथील मानकरी आंबले घराण्याकडून निशाण काठीचे परंपरेनुसार दर्गाह मंडपात आगमन झाले. चव्हाणवाडा येथून लवाजम्यासह चुनालेप विधीवतपणे लवाजम्यासह दर्गाह तुरबती ठिकाणी नेण्यात आला. तो सेवेकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर तुरबतीवर चुनालेप चढवून प्रार्थना केली.
यावेळी रणजितसिंह सरकार, संग्रामसिंह सरकार, पृथ्वीराज चव्हाण, विवेक मोकाशी, शकील मुजावर, अमजद मुजावर, मंजूर मुजावर, तौफिक मुजावर, सद्दाम मुजावर, बंडोपंत गंथडे, दिलीप रावळ, दत्ता रावळ, प्रदीप रावळ, शरदचंद्र मळगे, निलेश पावले, सचिन पावले, आतिश सुतार, कृष्णा पिसे यांच्यासह मानकरी उपस्थित होते.
यंदा हा उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊरूस उत्सव कमिटीने जय्यत तयारी केली आहे. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. या उरुसासाठी अनेक प्रकारची दुकाने व पाळणे दर्गा परिसरात दाखल झाली आहेत. भाविकांनी उरूस परंपरेनुसार साजरा करावा, असे आवाहन ऊरूस उत्सव कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी केले आहे.
उरुसानिमित्त १६ पासून चव्हाणवाडा येथे सनई चौघडा वादन सुरू झाले आहे. सोमवारी चव्हाण वारसांच्या हस्ते दर्याला चुना लावण्याचा कार्यक्रम झाला. बुधवारी (ता.२५) चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप घालण्याचा कार्यक्रम झाला. गुरुवारी (२६ ) गंधरात्र आहे. त्यानिमित्त चव्हाण वाड्यातून मिरवणुकीने गंध नेला जाणार आहे. या दिवशी संदल बेडीचा उरूस साजरा केला जाणार आहे.
शुक्रवारी (ता.२७) भर उरूस होणार आहे. त्यानिमित्त चव्हाण वारसांतर्फे दर्गाह तुरबतीला गलेफ चढवला जाणार आहे. उरूस काळात विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.२८) शिळा उरूस आहे. चव्हाण वाडा येथे खारीक व उदींचा कार्यक्रम, मानाचे फकीर रवानगी व भंडारखाना, रविवारी (ता.३१) पाकळणीचा कार्यक्रम होऊन उरुसाची सांगता होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta