१५० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती; रहदारी पोलिसही कार्यरत
निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेबांचा दर्गा उरूस २६ ते २८ अखेर साजरा होत आहे. गुरुवारपासून उरूसाला प्रारंभ झाला शुक्रवारी (ता.२७) मुख्य दिवस असून, उरूसासाठी जादाची पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. १५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. बसस्थानक परिसर व आवश्यक ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी चिकोडी येथील वाहतूक पोलिसांचीही मदत घेतल्याची माहिती मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी दिली.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या दर्गाह दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश व इतर राज्यांतून भाविक येत आहेत. नगरपालिका व पोलिस प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. पोलिस प्रशासनानेही उरूस शांततेत पार पडण्यासाठी शिवाजी चौक ते दर्गाह परिसरापर्यंत ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.
निपाणी पोलिस सर्कल अंतर्गत असलेल्या उपनिरीक्षकांसह ६२ कर्मचारी, चिकोडी, अथणी, रायबाग व संकेश्वर येथील पोलिस कर्मचारी, राज्य राखीव व केएसआरपीसी दलाच्या तुकडीसह एकूण १५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्या आहेत. भाविकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून उरूस शांततेत पार पाडावा. नवरात्रोत्सोव, दुर्गामाता दौड कार्यक्रमही शांततेत पार पडले. उरूसही शांततेत पार पाडावा, असे आवाहन तळवार यांनी केले आहे.