
‘जय अंबे, जगदंबे…’चा जयघोष; नवरात्रोत्सवाची सांगता
निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवात शक्तीची देवता आदिशक्ती दुर्गादेवीची आराधना भक्तिभावाने करण्यात आली. दहाव्या दिवशी विजयादशमी दसरा उत्साहात झाला. बुधवारी (ता. २५) शहर आणि परिसरात ‘जय अंबे जगदंबे’ च्या जयघोषात सवाद्य मिरवणुकीने दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून नवरात्रोत्सवाची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत शहर आणि ग्रामीण भागात पारंपरिक वाद्यांचा गजर करून मिरवणुका निघाल्या. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
नवरात्रोत्सवात रामपूर येथील एनटीएम नवरात्र मंडळातर्फे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सलग नऊ दिवस दांडिया, राससह सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम सुरू होती.
उत्सवानिमित्त मंडळाने महिला लेझीम पथकाच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढली. याशिवाय मलगोंडा पाटील, विलास करपे, अनिल तांदळे, महांतेश मुगळे, बंडा दावणे, शशिकांत मदने, बाळू नावलगी दाम्पत्यांच्या हस्ते नवदुर्गा होम हवन करण्यात आले.
तब्बल पाच तास सुरू असलेल्या मिरवणूकीत युवती,महिलांनीही सहभाग घेतला. विद्युत रोषणाई आणि आतषबाजी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळ्याही रेखाटल्या होत्या.
—————————————————————
ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवाचा ट्रेंड
पूर्वी केवळ शहरात काही मंडळांकडून नवरात्रोत्सवात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना होत असे. आता ग्रामीण भागातही सार्वजनिक मंडळांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती प्रतिष्ठापना व समाजोपयोगी उपक्रम राबवले. त्यामुळे ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवाचा ट्रेंड दिसून आला.
Belgaum Varta Belgaum Varta