
शॉर्टसर्किटने आग ; अग्निशामकच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील सुभाष बापू गोसावी यांच्या घराला शुक्रवारी (ता.२७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये संसार उपयोगी साहित्याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील सुभाष बापू गोसावी हे दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. तात्काळ त्याची माहिती अरुण आवळेकर यांनी अग्निशामक दलासह हेस्कॉम कार्यालयाला कळविली. अग्निशामक वाहन घटनास्थळी येईपर्यंत घरातील दूरचित्रवाणी संच, फर्निचर, कॉट, गादी, तिजोरी कपडे, फॅनसह संसार उपयोगी सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. या आगीमध्ये गोसावी यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले.अग्निशामक दलाचे वाहन तत्परतेने दाखल झाल्याने परिसरातील घरे आगीपासून बचावलु आहेत. घटनेची माहिती समजताच माजी आमदार काकासाहेब पाटील, तहसीलदार, हेस्कॉम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने भेट घेऊन पाहणी केली. अग्निशामक दलाचे जवान ए. डी. मुल्ला व्ही.एम. निर्मळे, एस. एस. कट्टी, के. एम. कुरी, व्ही. एस. देवऋषी व सहकार्यानी ही आग आटोक्यात आणली.
घटनास्थळावर असलेले ट्रांन्सफार्मर वारंवार खराब होत असून निरंतर पणे त्यातून विजेच्या ठिणग्या पडतात. याबाबत बऱ्याचदा तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या पुढील काळात संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर उंचीवर बसविण्याची मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta