
चार दिवसांनंतर ७ तास थ्री फेज वीज पुरवठा : रात्री १० तास सिंगल फेज वीज
निपाणी (वार्ता) : यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पाणी असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले. त्यामुळे दिवसा १० तास थ्री फेज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन झाले. यावेळी अधिकारी महंमद रोशन यांनी चार दिवसानंतर ७ तास थ्री फेज आणि रात्री दहा तास सिंगल फेज वीज पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिली.
राजू पोवार म्हणाले, यापूर्वी या कार्यालयावर सुरळीत वीजपुरवठ्यासह जळालेल्या ऊसाला तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. पण कार्यवाही न झाल्याने दुसऱ्यांदा मोर्चा काढून जाब विचारण्यात आला. तब्बल सहा तासाच्या आंदोलनानंतर हेस्कॉमचे कार्यकारी संचालक मोहम्मद रोशन यांनी जळालेल्या उसासंदर्भात नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित विभागीय कार्यालयांना आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
मोहम्मद रोशन यांनी, विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पुरेशा वीज पुरवठ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यासाठी वीज पुरवठा समिती स्थापन केली आहे. त्यानुसार शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. इतर राज्यांतून वीज खरेदी करून पुरवठा केला जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, महेश सुभेदार, आनंद पाच्छापुरे, आशा एम., बसू पाच्छापुरे, बाबासाहेब पाटील, चिनू कुळवमोडे, सागर पाटील, विजय माळी, नामदेव साळुंखे, सर्जेराव हेगडे, बबन जामदार यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta