निपाणी (वार्ता) : निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे राजमणी चॅम्पियन्स ट्रॉफी या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (ता.२९) झाले. या स्पर्धा ७ नोव्हेंबर पर्यंत येथील श्री समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर होत आहेत.
ओंकार शिंदे यांनी स्वागत केले. प्रशिक्षक सचिन फुटाणकर यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक रोहन साळवे, डॉ. एम. ए. शहा, प्रकाश शहा, बसवराज पाटील व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रोहन साळवे यांनी, निपाणीतील खेळाडूंना घडविण्यासाठी निपाणी फुटबॉल अकॅडमी यांच्याकडून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांच्या हस्ते सलामीच्या सामन्याची नाणेफेक करण्यात आली.
यावेळी शिरीष शहा, राजमणी ग्रुपचे कार्यकारी संचालक प्रतीक शहा, सोमनाथ शिंदे, नितीन शहा, रोहित पाटील, बालाजी यादव, आकाश खवरे, अतुल सावरकर, अक्षय जयकर, विनायक जाधव यांच्यासह मान्यवर, संघमालक, खेळाडू व फुटबॉल प्रेमी उपस्थित होते.