निपाणी (वार्ता) : शहरातील न्यायालय इमारत ही भव्य व दिव्य असून नगरीच्या सौदर्यात व वैभवात भर घालणारी आहे. पण या न्यायालयात असणाऱ्या स्वच्छतागृहांचा योग्य प्रकारे वापर न झाल्याने तेथील अस्वच्छता पाहण्यासारखी झाली आहे. याशिवाय गुटखा, मावा, पान चघळून पिचकारी मारून रंग कामच केले आहे. त्यामुळे स्वछतागृह असूनही तेथील अस्वच्छता पाहून आत जाणे कठीण झाले आहे. परिणामी दुर्गंधी पसरली असून त्याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी माजी सभापती राजन चिकोडे यांनी पत्रकान्वये केले आहे.
न्यायालयाच्या कामासाठी दररोज शेकडो नागरिक येथे ये- जा करतात. पण अस्वच्छ स्वच्छतागृहामुळे वयोवृद्ध नागरिक, महिलांची गैरसोय होत आहे. न्यायालयात न्याय मागण्यासाठी येणारे वादी, प्रतिवादी त्यातील प्रामुख्याने वृध्द, अपंग आजारी व्यक्तींना बसण्यासाठी अपुरी असा व्यवस्था आहे. त्यामुळे जिना हीच बैठक व्यवस्था म्हणून नागरीक वापरत आहेत. निपाणी हा तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणच्या न्यायालयात नागरीकांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी आसन व्यवस्था करून नागरिक, वृद्ध, आजारी व्यक्तींची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी न्यायालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी चिकोडे यांनी केली आहे.