राजेंद्र वडर; ७ पीडिओची कमतरता
निपाणी (वार्ता) : तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायती असून त्यापैकी २० ग्रामपंचायतमध्ये पीडिओ कार्यरत आहेत. महत्वाच्या मोठ्या सात ग्रामपंचायतमध्ये पीडिओ नाहीत. दोन दोन ग्रामपंचायतमध्ये एकच पीडिओ कार्यरत आहे. यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र वडर-पवार यांनी केला आहे. याशिवाय याबाबत ग्रामीण अभिवृद्धी व पंचायत राज्य विभागाचे प्रियांक खर्गे यांना निवेदन पाठविल्याचे सांगितले.
गळतगा येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. राजेंद्र वडर म्हणाले, ग्रामपंचायतकडून गावांच्या विकासासाठी अधिकार देण्यात येत आहेत. सरकारकडून महात्मा गांधी उद्योग खात्री योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. पण निपाणी तालुक्यात ग्रामपंचायतमध्ये पीडिओची जागा रिकाम्या असून तालुक्यात असलेल्या सहा मोठ्या आणि महत्वाच्या ग्रामपंचायतमध्ये दोन दोन ठिकाणी एकच पीडिओ असल्याने कोणतेही काम होताना दिसत नाही.
ग्रामपंचायतसाठी आलेला निधी खर्च करण्यासाठी पीडिओची गरज असताना सात ग्रामपंचायतमध्ये पीडिओ नाहीत. त्यामुळे गावांचा विकास खुंटला आहे. पण याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ, भोज, कारदगा, मानकापूर, गळतगा व भोज या सहा ग्रामपंचायतमधील पीडिओना प्रत्येकी दोन ग्रामपंचायतचे काम करावे लागत आहे. यातून आठ आठ दिवस ग्रामपंचायतमध्ये पीडिओ दिसत नाहीत.
ग्रामपंचायतमध्ये पीडिओ नसल्याने नागरिकांना उतारा मिळणे, परवाना मिळणे अथवा कोणतेही कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. ग्रामपंचायत पीडिओबाबत विचारले असता त्यांना दुसऱ्या एका ग्रामपंचायतचे देखील जबाबदारी असून ते तिकडे गेल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये देखील पीडिओ कार्यरत नसतात. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत व्हिडीओद्वारे बैठक सुरु असल्याचे सांगून काम चुकार करीत आहेत. यामुळे देखील नागरिकांचे कामे होत नाहीत. त्यासाठी पंचायत राज्य आणि ग्रामीण अभिवृद्धीचे प्रियांक खर्गे यांना याबाबत निवेदन पाठविले असून बेळगांव जिल्हा पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना देखील याबाबत माहिती देणार असल्याचे राजेंद्र वडर यांनी सांगितले.