निपाणी (वार्ता) : प्रगतीनगर येथील रहिवासी पहिले निवृत्त आयपीएस अधिकारी संजय वसंतराव माने (वय ६१) यांचे सोमवारी (ता.६) रात्री हृदयविकाराने निधन झाले. सध्या ते इंदौर (मध्यप्रदेश) येथे वास्तव्यास होते. विशेष म्हणजे त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. बुधवारी (ता.८) सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर बसवानगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मयत माने हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित होते.
संजय माने यांचे मुळगाव मलिकवाड (ता.चिकोडी) असून ते गेल्या ३६ वर्षापासून पोलीस खात्यात सेवेत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जत्राटवेस तर माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर तर महाविद्यालय शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे झाल्यानंतर त्यांनी पुढील पदवीचे शिक्षण सुरतकल (मंगळूर) येथे घेतले होते.ते सन १९८९ मध्ये पोलीस खात्यात रुजु झाले होते त्यांची मुंबईसह भोपाळ, मध्यप्रदेश, ग्वाल्हेर, रतलाम, छिंदवाडा, सागर येथे सेवा झाली असून गतवर्षी ते इंदौर येथुन उपपोलीस महानिर्देशक (एडीजेपी) या पदावरून निवृत्त झाले होते.
सोमवारी रात्री त्यांना इंदौर येथे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थीव इंदौर येथून निपाणीत बुधवारी आणल्यानंतर प्रगतीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मयत माने हे परिवर्तन चळवळीचे प्रा.डॉ. अच्युत माने यांचे पुतणे तर निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती अजय माने यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात सर्व स्तरातील मान्यवरांनी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
Belgaum Varta Belgaum Varta