वाहनधारकांसह नागरिकांतून संताप : सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १५ वर्षांपूर्वी होऊन वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर गतवर्षापर्यंत पूंज – लॉईड कंपनीने मार्गाच्या देखभालीसह रस्त्याकडेला झाडे लावणे व सुशोभीकरणाचे काम केले. त्यानंतर या कंपनीच्या देखभालीचीची मुदत संपली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह सेवारस्ते झुडपात हरवले. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
पूंज-लॉईडने होनगा- कोगनोळीपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे काम चांगल्या प्रकारे केले. दुभाजकावर रंगीबेरंगी, शोभिवंत फुलझाडेही जगवली. दुतर्फा स्वच्छतेसह किरकोळ डागडुजीची कामेही वेळेवर केल्याने कोणतीही समस्या जाणवलेली नाही. पण वर्षी या कंपनीची मुदत संपल्याने महामार्ग दुभाजक व सेवा रस्त्यावरही अनेक काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. निपाणी परिसरातील नागरिक सेवा रस्त्यावरून दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसह विविध कामांसाठी ये-जा करतात. या झाडांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास होत आहे. सध्या सेवा रस्त्यासह महामार्गाच्या कडेला झुडपे मोठी झाली असून काही झुडपे सेवा रस्त्यावर लोंबकळत आहेत. त्याची वाहनधारकांना अडचण होत आहे.
—————————————————————–
महामार्ग आणि सेवा रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.संबंधितांनी नागरिकांनी वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करावी.’
-निकू पाटील, नागरिक, निपाणी
—————————————————————–
‘वर्षापूर्वी जयहिंद कंपनीकडे महामार्गाच्या देखभालीचे काम सोपविले आहे. त्यानुसार संकेश्वर हद्द ते कोगनोळीपर्यंतच्या मार्गाची पाहणी केली. पण सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे स्वच्छतेचे काम रखडले आहे. लवकरच त्याच्या देखभालीसह दुतर्फा उगवलेल्या झाडाझुडपांची स्वच्छता करण्यात येईल.’
-शरीफ करोशी, निरीक्षक, भरारी पथक
Belgaum Varta Belgaum Varta