निपाणी (वार्ता) : दिवाळी सणाला गुरुवारपासून (ता.९) वसुबारसने प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान या सणामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे.
निपाणी परिसरावर दुष्काळाचे सावट असले तरी वर्षभरातील आनंदाचा सण म्हणून शहर आणि ग्रामीण भागात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे. यामुळे यंदा शेतात निघालेला सोयाबीन विकून शेतकरी दिवाळीची खरेदी करीत आहेत. दीपावलीच्या पूजनासाठी आवश्यक असलेल्या आकर्षक लक्ष्मी प्रतिमा बाजारात विक्रीसाठी आल्या असून चाळीस रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंतच्या विविध आकारात उपलब्ध आहेत. तसेच पूजनासाठी लागणाऱ्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. वीस रुपये ते दोनशे रुपये डझनपर्यंतच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी आहेत.
लक्ष्मीपूजनासाठी घराघरांत झाडूचे पूजन होते. यामुळे परिसरातील गावागावांतील झाडू विक्रेते चौका चौकात बसून झाडू विक्री करीत आहेत. चाळीस रुपयांपासून साठ रुपयापर्यंत त्याचे दर आहेत.
शेतात आलेला सोयाबीन विकून शेतकरी दिवाळीसाठी खरेदी करीत आहेत. याशिवाय दूध संस्थांचे लाभांश आल्याने प्रामुख्याने कपडे खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे बजेट कमी झाले असले तरी खरेदीला बाजारात गर्दी दिसून येत आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदीचे दागिने दुचाकी, दूरचित्रवाणी संच, भेटवस्तू, आकाश कंदील, भांडी, मोबाईलसह संसार उपयोगी साहित्याची चार दिवसात खरेदी होणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार विविध व्यवसायिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंनी आपली दुकाने सजवली आहेत.एकंदरीत बाजारपेठेत दिवाळीच्या निमित्ताने चैतन्याचे वातावरण आहे.
——————————————————————-
सर्वच वस्तूंच्या दरात वाढ
सर्वच वस्तूंच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे.तरीही दिवाळी साजरी करण्यासाठी जो तो आपापल्या परीने खरेदी करताना दिसून येत आहे. विशेषता महिला वर्ग तोरण, रांगोळी, दिवे, नवीन कपडे साड्या, संगधीत उटणे, तयार फराळ खरेदी करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta