दुचाकी, सायकलची विक्री; कापड, भांडी दुकानातही गर्दी
निपाणी (वार्ता) : सोने-चांदीबरोबरच दुचाकी खरेदीस प्राधान्य देऊन ग्राहकांनी बाजारपेठेत मंगळवारी (ता. १४) दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधला. महागाईचे सावट असतानाही खरेदीसाठी दिवसभर गर्दी झाली होती. सोने ६० हजार २०० रुपये तोळा, तर चांदी ७० हजार ५०० रुपये किलो असतानाही निपाणी भागातील नागरिकांनी लाखोंचे सोने खरेदी केले. त्याशिवाय ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी आणि भांड्याच्या खरेदीसाठीही चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय दुचाकी खरेदी करून ग्राहकांनी खरेदीचा उच्चांक साधला. तसेच भांडी आणि कापड दुकानात दिवसभर ग्राहकांची गर्दी दिसून आली.
दिवाळी पाडव्याच्या खरेदीनिमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली होती. विशेषतः इलेक्टॉनिक वस्तू, भांडी, सोने-चांदी आणि आगाऊ नोंदवून ठेवलेल्या दुचाकी नेण्यासाठीही गर्दी होती. दसऱ्यानंतर दिवाळी पाडवा निमित्ताने एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर, संगणक, मोबाईल, लॅपटॉप आदींच्या खरेदीसाठी दुकानात वर्दळ होती. ग्रामीण भागांतील ग्राहकांनी भांड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली होती.
शहरातून विविध कंपन्यांच्या दुचाकीसह सायकलिंची विक्री झाली. वाहनासह अन्य वस्तूंसाठी १० ते १५ टक्के रक्कम भरल्यानंतर फायनान्स कंपन्यांनी कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे दहा मिनिटांत कर्ज मंजूर केल्याने उलाढाल वाढली. काही ग्राहकांनी बेळगाव, कोल्हापूर, सांगली बाजारपेठेत जाऊनही चारचाकी वाहनांची खरेदी केली. पेट्रोल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सायकल आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदीकडेही नागरिकांचा ओढा वाढला होता. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी खरेदी केली. एकंदरीत दिवाळी पाडव्याची बाजारपेठ तेजीत असल्याने व्यावसायिकांतूनही समाधान व्यक्त झाले.
————————————————————–
‘ग्राहकांनी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून सोने चांदी खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. यंदा सर्वच व्यवसायिकांनी विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने उपलब्ध केले होते. त्यामुळे निपाणी बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली.’
-रवींद्र शेट्टी, सराफ व्यावसायिक, निपाणी
—
Belgaum Varta Belgaum Varta