
राजू पोवार ; यादगिरी येथे जनजागृती बैठक
निपाणी (वार्ता) : यादगिरी, रायचूर, विजापूर, बागलकोट जिल्ह्यामध्ये उस, सोयाबीन आणि कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. पण दरवर्षी या शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात वरील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढून घेराव घातला जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. यादगिरी येथे आयोजित जनजागृती बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, सोयाबीन, ऊस आणि कापसाला योग्य दर मिळावा, यासाठी रयत संघटनेने आतापर्यंत मंत्री महोदयांसह जिल्हाधिकारी तलाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. पण आज तागायत याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे बेळगाव येथे होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री महोदयांना घेराओ घालून खर्चाच्या तुलनेत योग्य दर देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी, कर्नाटकासह सीमाभागातील महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी तीन हजार रुपयांपर्यंत जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा, अशी रयत संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी आहे. हा दर मिळवण्यासाठी विधानसभेवर ७ डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
यावेळी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष मल्लाप्पा अंगडी, चिकोडी जिल्हा कार्याध्यक्ष विवेकानंद घंटी, शशिकांत पडसलगी, वासू पढरोळी, महादेव हुलकर, मायाप्पा लोरूरे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta