निपाणीतील गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी घडवला इतिहास
कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : भारतीय सैन्यात सेवा बजावताना आपल्या खडतर परिश्रमाच्या जोरावर दोन बंधूंनी सुभेदार मेजर या उच्च पदाला गवसणी घालून इतिहास घडवला आहे. मूळचे कनगला येथील सध्या निपाणी येथे एकत्र कुटुंबात स्थायिक ’सुभेदार मेजर गजानन चव्हाण’ (7 मराठा लाईट इन्फंट्री) व ’सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण’ (12 मराठा लाईट इन्फंट्री) यांची ही यशोगाथा संपूर्ण मराठा रेजिमेंट, देशभरातील सकल मराठा व महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणारी आहे.
गजानन चव्हाण हे गेल्या दहा महिन्यांपासून आफ्रिकेतील लोकशाही गणराज्य कांगो येथे संयुक्त राष्ट्र शांती सेनेतून सेवा बजावत आहेत. सुभेदार मेजर म्हणून जानेवारी 2020 मध्ये त्यांनी कार्यभार हाती घेतला. तर त्यांचे बंधू ’सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण’ यांनी नुकताच 1 जानेवारी 2022 रोजी ’72 टास्क फोर्स’ मध्ये सुभेदार मेजर म्हणून पदोन्नती मिळवून इतिहास घडवला.
एकाच कुटुंबातील सख्खे बंधू अशा उच्च पदावर विराजमान होण्याची ही अतिदुर्मिळ व कौतुकास्पद बाब ठरली आहे. गजानन यांनी शांती सेनेतून सेवा बजावताना न्यायारागोंगो ज्वालामुखीने ’कांगो’ तील गोमा सिटी उध्वस्त करत हाहाकार माजवला. अशा बिकट प्रसंगी तेथील लोकांचे प्राण व मालमत्तेच्या रक्षणार्थ मराठा जवानांसह अतुलनीय कामगिरी होती. दोन्ही बंधू यशामागे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आईवडिलांची प्रेरणा व आशिर्वाद असल्याचे सांगतात.
देशसेवेचा हा वारसा वडील स्वातंत्रसेनानी स्व. गोविंदराव चव्हाण यांच्याकडूनच त्यांना लाभला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील छोडो भारत चळवळीसह देश सेवेसाठी चार लढायांमध्ये त्यांनी आपला पराक्रम गाजवला होता. गोविंदमामा चव्हाण या नावाने निपाणी सीमाभाग व बेळगाव जिल्ह्यात त्यांना आदराचे स्थान होते. काही महिन्यापूर्वी मातोश्री श्रीमती कृष्णाबाई यांच्या निधनप्रसंगी दोन्ही बंधू देशरक्षणाच्या श्रेष्ठ कर्तव्यामुळे अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. दोन्ही बंधूंना या कार्यात आपल्या पाच बहिणींचेही प्रोत्साहन लाभले आहे. सुट्टीवर आल्यानंतर घरी न थांबता ते निपाणी व परिसरातील विविध समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहून विविध मंडळे व तरुणांना प्रेरणा देत असतात. यातून त्यांनी आपले हजारो चाहते निर्माण केले आहेत. एकंदरीत चव्हाण बंधूंची सैन्यदलातील ही गगन भरारी सर्वांसाठी भूषणावह ठरली आहे हे मात्र निश्चित!