व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू
निपाणी (वार्ता) : कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी निपाणी आणि परिसरात शनिवार (ता.8) आणि रविवारी (ता.9) दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी निपाणी व परिसरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण बंद राहिली.
शुक्रवारी (ता.7) रात्रीपासून विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने ध्वनिक्षेपकावरून सुचना दिल्या होत्या. निपाणी सर्कलमधील शहर, ग्रामीण व बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्यावतीने 2 दिवस विकेंड कर्फ्यूच्या काळात बंदोबस्ताबाबत नियोजन करण्यात आले आहे. विकेंडमध्ये किराणा माल, भाजी, फळविक्री, रेशन दुकान, डेअरी, बेकरी, यांच्यासह सर्वप्रकारची अन्नधान्य विक्री केंद्रे हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहे पूर्णपणे बंद होती. हॉस्पिटल, मेडिकल दुकाने, बस सेवा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, दूध पुरवठा, वडापाव वाहतूक सुरू होती. अनावश्यक वस्तुंमध्ये प्रामुख्याने दारूची दुकाने रविवारपर्यंत बंद आहेत.
बस सुरू प्रवाशांची पाठ
विकेंड कर्फ्यूला बस सेवा व खासगी वडाप वाहतूक सुरू होती. पण प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविल्याने बस स्थानक परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
बाजारपेठा, बँका ठप्प
शनिवार रविवार दोन दिवस कर्फ्यू असल्याने निपाणी शहरातील सर्वच बाजारपेठा बंद होत्या. शिवाय महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँकाही बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते.
सर्वच रस्त्यावर पोलीस
विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक आणि शहरातील सर्वच रस्त्यावर पोलीस कार्यरत होते. मात्र पहिल्या दिवशी सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने पोलिसांवरील ताण कमी दिसत होता.