खानापूर (वार्ता) : कोरोना व्हायरस तसेच ओमिक्रॉन व्हेरियंट साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्यात विकेंड कर्फ्यू लागू केल्याने खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. 7 रोजी 8 वाजल्यापासून ते सोमवारी दि. 10 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत नियम लागू करण्यात आले आहे. यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक निर्बंध लावण्यात आल्याने खानापूरच्या जांबोटी क्रॉसवरील बस स्थानकावर प्रवाशांच्या प्रतिक्षेत उभ्या आहेत. केवळ हाताच्या बोटा मोजण्या इतके प्रवासी खानापूर बसस्थानकामध्ये दिसून आले. प्रवाशापेक्षा धावणार्या बसेसची संख्या अधिक होत्या.
मात्र खानापूर शहरात जीवनावश्यक वस्तूची दुकाने, डेअरी, बेकरी, फळविक्री, अन्नधान्य विक्री, शेतीमालाशी निगडीत खरेदी विक्री केंद्रे तेवढीच खुली होती. तसेच दवाखाने, मेडिकल चालु होते. मात्र नागरिकांची रहदारी कमी होती. त्यातच शनिवारी खानापूर बाजार बंद असतो त्यामुळे रहदारीच्या वर्दळीचा प्रश्न नव्हता. तसेच दुसरा शनिवार सरकारी कार्यालयाना सुट्टी ही होती. त्यामुळे खानापूरात विकेंड कर्फ्यूचा फारस परिणाम दिसून आला नाही.
खानापूरात बससेवे प्रमाणे रिक्षासारख्या खाजगी वाहतुक सेवा उपलब्ध होत्या. मद्यविक्रीवर कडक बंद करण्यात आली होती.
पणजी-बेळगाव महामार्गावर वाहतूक चालू होती मात्र अनावश्यक वस्तूंची दुकाने आणि कार्यालये बंद होती. उद्या रविवारी आठवड्याचा बाजार बंद राहणार आहेत. प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बंधनकारक होते. यावेळी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार प्रवीण जैन यांनी खानापूर शहराला फेरफटका मारून माहिती घेतली.
चोर्ला, कणकुंबी चेकपोस्टला तहसीलदारांची भेट
खानापूर (वार्ता) : सरकारच्या आदेशानुसार तसेच जिल्हा अधिकार्यांच्या सुचनेनुसार चोर्ला, कणकुंबी (ता. खानापूर) येथील चेकपोस्टला खानापूरचे नुतन तहसीलदार प्रविण जैन यांनी भेट देऊन पाहणी करून येथील परिस्थितीची माहिती घेतली व काही सुचना केल्या. यावेळी गोवा आणि महाराष्ट्र राज्यातून येणार्या प्रवाशाकडून कोविड लसीकरण प्रमाण पत्राची पडताळणी सक्तीची करून घेणे, याशिवाय गोवा तसेच महाराष्ट्रातुन येणार्या प्रवाशांनी आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे, असे सांगितले. या ठिकाणी पोलिस, तसेच आरोग्यसेवा उपलब्ध केल्या आहेत. या कोरोना चाचणी अहवाल, आणि कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात यावा. अशी सुचना तहसीलदार प्रविण जैन यानी दिली आहे.