नियोजनाचा अभाव; वेळापत्रकही पाळले जात नसल्याने त्रस्त
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या निपाणी आगारातील गलथान, निष्क्रिय कारभारामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. योग्य नियंत्रण नसल्याने चिक्कोडी आगारा अंतर्गत निपाणी बसस्थानकावरून बसेस नियोजित वेळी सुटत नाही. परिणामी एकावेळी प्रवाशांची गर्दी वाढून बसमधील आसन मिळण्यासाठी प्रवाशी जीवघेणी धडपड करताना दिसत आहेत.
निपाणी बसस्थानकातून अवेळी बसेस मार्गस्थ होत असून व अनेक बसेसला नामफलकच नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. बसेस बसस्थानकात प्रवेश करतात प्रवाशांसह विद्यार्थी बसमागे धावतात. अनेक प्रवासी बसच्या खिडक्यातून, चालकाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळवत आहेत.काही प्रवासी खिडकीतूनच बसमधील शिटवर बॅग, रुमाल अगर एखादी वस्तू ठेवून आपली जागा आरक्षित करताना दिसत आहेत. जागेवरून अनेकदा प्रवाशात भांडणाचे प्रकार घडत आहेत.
सदर जीव घेणे प्रकार नियंत्रित करण्यासाठी बसस्थानकावर बऱ्याचदा ना पोलिस कर्मचारी असतो, ना एसटीचा कोणी कर्मचारी असतो. बहुतांश बसना स्टार्टर नसल्याने बस आगारातच लावून ठेवली जात आहे. बसस्थानकावरील ही परिस्थिती सुधारण्यासाठी आगारात चांगल्या व पुरेशा बस पुरविण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
—————————————————————-
हुपरी मार्गावर शर्यत
इचलकरंजी नंतर निपाणी-हुपरी या मार्गावर चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभरात बसच्या १० फेऱ्या होत आहेत. पण एकाच वेळी दोन- दोन बस सोडल्या जात असल्याने या मार्गावर बसची शर्यत लावण्याचा प्रकार दिसत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
——————————————————————–
‘सध्या आगारातील काही बस खराब झाल्या असून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वेळापत्रकात थोडाफार फरक पडला आहे. लवकरच वेळापत्रक सुरळीत केले जाईल.’
-संगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी
——————————————————————–
याकडे लक्ष देण्याची गरज
* बसेस वेळेवर सुटणे
* बसला फलक लावणे,
* प्रवाशी शिस्तीत बसमध्ये चढतील याकडे लक्ष देणे
* गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी
* सुस्थितीतील बस सोडणे