पुढील बैठकीसाठी बंगळूरमध्ये बैठकीचे निमंत्रण
निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनाने बेळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. ऊसाला कारखान्यांनी प्रति टन ३५०० आणि सरकारने २००० रुपये द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य संघटनेने आंदोलन छेडले होते. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रयत संघटनेच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून उर्वरित मागण्यासाठी रयत संघटनेच्या शिष्टमंडळाला पाचारण केले आहे.
याबाबत बोलताना राजू पोवार म्हणाले, बेळगाव जिल्हा कार्यालय अधिकाऱ्यांची नियुक्ती थांबली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आयुक्त कार्यालयातील पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या शेतीसाठी सात तास वीज पुरवठा केला जात आहे. यापुढे शेतीपंपासाठी आठ तास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
ऊस दर दराबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी रयत संघटनेला आमंत्रण दिले आहे. त्याशिवाय साखर कारखान्यातील काटा मारी बाबत सरकारतर्फे वजन काटा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वजन काटा पाहूनच ऊस देण्याचे आवाहन राजू पोवार यांनी केले आहे.
बैठकी प्रसंगी, आमदार दर्शन पुट्टापा, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, सुभाष शिरपूर, वासू पांढरोळी, सोमू बिराजदार, सुरेश परगनावर, किसन नंदी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.