बेडकिहाळच्या शैक्षणिक इतिहासात दुसऱ्यांदा डॉ. हर्षल कोरेचे यश; धनगर समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील मेंढपाळ कुटुंबातील डॉ. हर्षल कोरे यांनी वडील म्हाळू कोरे व आई संगीता कोरे यांच्या मार्गदशनाखाली वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन बेडकिहाळच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. समाजापुढे एक आदर्श निर्माण करून शिक्षणाचे महत्व दाखवू दिले आहेत. घरची परिस्थिती बिकट असताना मिळविलेले यश सर्व समाजासाठी आदर्शवत ठरले आहे.
डॉ. हर्षल कोरे यांनी बारावीनंतर एमबीबीएस शिक्षणात ३५२ रँकमिळवून राज्यात प्रथम तर देशात चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. २०२१-२२ साली एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गळतगा येथील आरोग्य केंद्रात वैद्याधिकारी म्हणून एकवर्ष सेवा बजावली. युपीएससीच्या तयारीसाठी त्यांना सत्यसाई शिक्षण संस्था अळीकेचे कार्यदर्शी चंद्रशेखर भट्ट, आयपीएस अधिकारी डॉ. बेनक प्रसाद, खडकलाटचे डॉ. मंजुनाथ आवडखान, राज्य आरोग्य विभागाचे निवृत्त संचालक, आप्पय्या नरट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
दिल्ली येथे युपीएससी केंद्रात १५ जुलै २०२३ रोजी परीक्षा पार पडली. त्यावेळी देशातून सुमारे १ लाखांवर विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यामध्ये ३,५०० जणांची निवड करून ५ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्तीर्ण झालेल्याची मुलाखत प्रक्रिया पार पडली होती. त्यामध्ये डॉ. कोरे यांनी २७० रँक मिळवून युपीएससीमध्ये उत्तीर्ण झाले. या यशामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
——————————————————————-
ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागासाठी
धनगर समाज आजही उच्च शिक्षणापासून वंचित आहे. अशा परिस्थितीत पालक व शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन मोलाचे होते. भविष्यात मी माझ्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागासह देशातील सर्वसामान्यांसाठी करण्याचा प्रयत्न करेन, असे मत डॉ. हर्षल कोरे यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta