
विज्ञान प्रायोगिक कार्यक्रमांची मेजवानी
निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता. निपाणी) येथील एचजे सीसी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्यावतीने ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. ‘ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी’ या संकल्पनेतून सुरु असलेल्या विज्ञान प्रसाराच्या यंदाच्या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मान्यवरांचा परिचय
संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष आठल्ये
आठल्ये हे कोल्हापूर येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून पर्यावरण तज्ञ म्हणून परिचित आहेत. व्यवसायाने ते स्वतः एम. एस. जनरल सर्जन वैद्यकीय पदवीधर असून ते पर्यावरण रक्षण संबंधित उपक्रमात सक्रीय आहेत. जंगलतोड, ग्लोबल वार्मिंग, जल प्रदूषण सारख्या जगातील पर्यावरणीय समस्या, पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, लोकांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाची भावना जागृत करणे, सुरक्षित, स्वच्छ आणि अधिक समृद्ध भविष्याचा आनंद घेण्यासाठी लोकांना परिसराची सुरक्षित आणि स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
विशाल घोडके
घोडके हे सध्या कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, पुणे येथे शासकीय कार्यालयात यशस्वी सेवा बजावली आहे. शिक्षण अर्धवट सोडून अल्पवयात मुलांना कामामध्ये गुंतवले जात असलेल्या अनेक ठिकाणी बाल कामगार धाडी टाकुन मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. पुणे माथाडी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले आहे. या संमेलनात प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तयारीबाबत मार्गदर्शन व संवाद साधणार आहेत.
डॉ. किशोर गुरव
डॉ. गुरव हे अर्जुननगर येथील देवचंद कॉलेज येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठमधून डॉक्टरेट पदवी घेतली आहे. साऊथ कोरिया येथील कोनांम नॅशनल युनिव्हर्सिटी गवंगजू येथे त्यांना संशोधन फेलोशिप मिळाली असून त्याच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे.त्यांचे अनेक संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रसिद्ध झाले आहेत. गेली १७ वर्षे ते सातत्याने संशोधन क्षेत्रात कार्यरत असून दोन पेटंट मिळवली आहेत.
माध्यमिक स्तरांवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी या संमेलनातुन ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
डॉ. तुकाराम डोंगळे
डॉ. डोंगळे हे कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांचे ‘नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी’ हे संशोधन क्षेत्र असून त्यावर त्यांनी शोध निबंध प्रसारित केले आहेत. त्यांना इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग, कोरिया विद्यापीठ, दक्षिण कोरिया यांचेकडून ‘पोस्ट डॉक फेलोशिप’ मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाची राज्य सरकार एकलव्य शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत त्यांनी सहभाग घेतला आहे.
मराठी विद्या परिषद, मुंबईतर्फे ‘प्रा. मनमोहन शर्मा अवॉर्ड्स फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी २०२३’ ने गौरविण्यात आले आहे. भविष्यातील विज्ञानातील बदल याबाबत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
बाळासाहेब मुल्ला
मुल्ला हे गडहिंग्लज जवळील गिजवणे हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते गडहिंग्लज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक असून गडहिंग्लज तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटनेचे अध्यक्ष आहेत.कोल्हापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून सर्पमित्र,हिप्नाटिस्ट, विविध सामाजिक संघटनांच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत .त्यांना आतापर्यंत व्यसनमुक्ती, आदर्श कार्य पुरस्कार महाराष्ट्र शासन, महात्मा फुले आदर्श शिक्षक, पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद आदर्श शिक्षक, जीवदया, रोटरी क्लब महाराष्ट्र हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अंधश्रद्धेचा पगडा ग्रामीण व शहरी समाजातून पूर्णपणे गेलेला नाही. संमेलनात ते ‘आंधश्रद्धेची निर्मूलन’ हा वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारा कार्यक्रम सादर करणार आहेत.
सनवी शुक्ला व इरम बागवान
विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर विज्ञानाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समाजाव्यात यासाठी डॉ. किशोर गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली देवचंद महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभागातील सनवी शुक्ला व इरम बागवान या विद्यार्थीनी टाकावू वस्तू व त्यापासून बनविलेल्या उपकरणव्दारे विज्ञान संकल्पनांचे सादरीकरण करणार आहेत.यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रयोग कौशल्य विकसित होण्यासाठी हा प्रयोगिक उपक्रम उपयोगी ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta