
नगरसेवक विलास गाडीवड्डर; कंत्राटदार, नगरसेवकांची बैठक
निपाणी (वार्ता) : शहरातील २४ तास पाणी योजनेवर ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पण कंत्राटदार जैन कंपनी आणि केयुआय डीएफसीच्या दुर्लक्षामुळे शहर आणि उपनगरात चार ते पाच दिवसातून एकदा पाणी दिले जात आहे. संबंधित कंत्राटदारांनी कामात सुधारणा न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिला. येथील नगरपालिका कार्यालयात सोमवारी (ता.१८) दुपारी आयोजित कंत्राटदार अधिकारी व विरोधी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते.
नगरसेवक गाडीवड्डर म्हणाले, पाणी योजनेतील हॉल्व आणि पाईपलाईनची माहिती कंत्राचा अधिकाऱ्यांना नाही. अक्कोळ क्रॉस आणि जत्राट वेस मधील पाण्याचे मोठे जलकुंभ बंद असूनही त्याची माहिती नगरपालिकेला दिलेली नाही. तर सदरचे जलकुंभ पाडून नव्या जलकुंभाचा प्रस्तावही दिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदार कंपनीचा आंधळा कारभार सुरू आहे. या उलट दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक महिन्याला लाखो रुपये नगरपालिकेकडून घेतले जात आहेत. सध्या तलावात पुरेसे पाणी असून पाणी सोडणारी यंत्रणा चुकीची आहे. त्यामुळे शहराला पाणीटंचाई भासत आहे.
नगरपालिकेचे काही कर्मचारी जैन कंपनीच्या पाण्यासाठी काम करत आहेत. त्यांचे वेतनही वेळेवर दिले जात नाही. शहरवाशीयांना २४ तास पाणी दिल्यास पाण्याची बचत होणार आहे. आता भविष्यात उन्हाळा सुरू होणार असून त्या दृष्टीने पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुढील काळात पाणी सोडणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनीही काळजीपूर्वक काम करावे. मंगळवारी (ता.२६) कंत्राटदारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलण्यात येणार आहे. यावेळी संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्यास नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यातर्फे पाणी योजना राबविण्याचा इशारा गाडीवड्डर यांनी दिला. यावेळी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनीही अधिकारी व नगरपालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
बैठकीस नगरसेवक दत्ता नाईक, शेरू बडेघर, संजय पावले, शौकत मनेर, डॉ.जसराज गिरे, दीपक सावंत, दिलीप पठाडे, विशाल गिरी, सुनील शेलार, आप्पा शेटके, शरद मळगे मारुती घाटगे, प्रवीण कणगले यांच्यासह कंत्राटदार कंपनीचे अभियंते कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta