
मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणी पोलिसांची बैठक
निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात विविध गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दोन्ही पोलीस ठाण्यांना तपासासाठी अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील पोलिसांनी सीमाभागात घडणाऱ्या गुन्ह्यावर लक्ष ठेवून सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी केले. कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील पोलिसांची येथील शासकीय विश्रामधामात सोमवारी (ता.१८) बैठक झाली. त्यावेळी पोलिसांना मार्गदर्शन करताना तळवार बोलत होते.
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील अंतर काही किलोमीटर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोपी कर्नाटकात तर कर्नाटकातील आरोपी महाराष्ट्रात चोरी दरोडे टाकून आपला डाव साधत आहेत. त्यामुळे परस्पर पोलीस ठाण्यांनी याबाबत जागृत राहून काम केले पाहिजे. अलीकडच्या काळात चिक्कोडी येथे एटीएम लांबवण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय खून, चोरी, दरोडे अशा घटना घडत आहेत. अनेकदा दोन्ही राज्यातील आरोपी एकमेकांच्या राज्यात खुन करून वेगवेगळ्या राज्यात त्याची विल्हेवाट लावत आहेत. त्यामुळे अशा घटनांची माहिती एकमेकांना दिल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, याविषयी चर्चा करण्यात आली.
याशिवाय बेपत्ता व्यक्तींचे छायाचित्र संबंधित पोलिसांना पाठवून दिले जाते. त्याविषयीही एकमेकांना माहिती देऊन सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर, निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक, शिवराज नायकवडी, कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गजेंद्र लोहार, गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन सरगर यांच्यासह मुरगुड, सदलगा येथील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta